एरंडोल : साडीचा केलेला झोका तुटून पडल्याने दिड वर्षीय बालिकेचा मृत्यू झाला तर दोन बहिणी जखमी झाल्या. ही धक्कादायक घटना एरंडोल तालुक्यातील सावदे प्र.चा. येथे शनिवारी दुपारी 12 वाजेच्या सुमारास घडली. या घटनेत अन्य दोन लहान बहिणी हा गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर जळगाव सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अर्चना धनसिंग पावरा (वय 1.5 वर्ष) असे मयत बालिकेचे नाव आहे.
अन्य दोघे बहिणी गंभीर जखमी
सावदे प्र.चा. येथे धनसिंग शीला पावरा हे सुमारे पंधरा वर्षांपासून वास्तव्यास असून गावातील शेतकर्यांची शेती बटाईने करून आपल्या परीवाराचा उदरनिर्वाह करतात. शनिवारी सकाळी जयसिंग व त्याची पत्नी हे शेतासाठी गेले तर धनसिंगची सासु व त्याच्या तीन चिमुकल्या मुली घरी होत्या. कच्च्या विटांच्या घरावर लोखंडी पाईपाला साडीद्वारे केलेल्या झोक्यात तीनही मुली खेळत असतानाच अचानक साडीचा झोका तुटला व कच्च्या विटा तीन्ही मुलींच्या अंगावर पडल्याने अर्चना धनसिंग पावरा या दीड वर्षीय बालिकेचा मृत्यू झाला व अन्य दोन साडे तीन वर्षे व पाच वर्षाच्या दोन्ही बहिणी गंभीर जखमी झाल्या. दोघींवर जळगाव सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मयत अर्चना हिच्यावर सायंकाळी सावदे येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.