दहावी-बारावी परीक्षार्थींच्या झोपडीसाठी अल्टीमेटम
भुसावळ : दहावी-बारावी परीक्षेमुळे रेल्वेच्या जागेवरील झोपडपट्टीचे अतिक्रमण तोडू नये या मागणीसाठी जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक व रेल्वे डीआरएम यांच्या संयुक्त बैठकीत तोडगा काढण्यात आला. दहावी-बारावी परीक्षार्थी राहत असलेल्या झोपडीला तूर्त न पाडता अन्य अतिक्रमण पाडण्यात यावे, यावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
शनिवार, 3 रोजी त्या संदर्भात रेल्वे प्रशासन झोपडपट्टी धारकांना नोटीसा बजावणार आहे. जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर, जिल्हा पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे, डीआरएम आर.के.यादव यांनी गोपनीय बैठक घेत चर्चा केली. झोपडपट्टीत राहत असलेल्या मात्र दहावी-बारावी परीक्षेस बसलेल्या विद्यार्थ्याचे हॉल तिकीट तसेच प्रवेशपत्राची प्रत रेल्वे प्रशासन नोटीस चिपकल्यानंतर आठ दिवसापर्यंत स्वीकारेल तसेच त्याबाबत खातरजमा झाल्यानंतर ती झोपडपट्टी परीक्षा होईस्तोवर तोडली जाणार नाही मात्र अन्य झोपडपट्टीचे अतिक्रमण हटवले जाईल, असे सूत्रांनी सांगितले.