धुळे । शहरात अनेक खाजगी जागांवर असलेली अतिक्रमणे नियमानुकूल करून रहिवाशांना 7/12 उतारे मिळावेत, अशी मागणी आ. अनिल गोटे यांनी मुख्यमंत्र्यांकडे के ली असता जिल्हाधिकार्यांनी तात्काळ बैठक घेवून हा प्रश्न निकाली काढावा, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिल्याची माहिती आ. अनिल गोटे यांनी दिली आहे. हा निर्णय झाल्यास झोपडपट्टीधारकाला एक रूपयाही खर्च न करता जागा नावावर होण्याचा मार्ग मोकळा झाला असून याप्रकरणी दलाली करणार्यांना थारा न देण्याचे आवाहनही आ. गोटेंनी केले आहे.
मुख्यमंत्र्याच्या लक्षात आणून दिली परिस्थिती
यासंदर्भात सविस्तर वृत्त त्यांनी प्रसिध्दीस दिले असून त्यात म्हटले आहे की, धुळे शहरात एकूण 38 अधिकृत झोपडपट्ट्या आहेत. वर्षानूवर्षे आणि पिढ्यांनपिढ्या येथे हलाखीची जीवन जगणारे गोरगरीब, दीन-दुबळे यांच्या असहायतेचा फायदा घेवून 7/12 त्यांच्या नावावर करून देण्याचे आमिष दाखवून काही पुढार्यांनी त्यांच्याकडून पैसे उकळले. मात्र या लोकांना सातबारे मिळालेच नाहीत. त्यामुळे त्यांनी आ. गोटेंकडे विनंती केली असता त्यांनी या प्रश्नात लक्ष घालून थेट मुख्यमंत्र्यांकडेच रदबदली केली. परिणामी, सोमवारी मुख्यमंत्र्यांनी अतिथी गृहावर आ. गोटेंना भेट दिली. यावेळी आ. गोटेंनी 15 मिनीटात परिस्थिती लक्षात आणून दिल्याने मुख्यमंत्र्यांनी याबाबत धुळे जिल्हाधिकार्यांना लेखी आदेश दिले.
…तर पोलिसात तक्रार करावी
या आदेशानूसार जिल्हाधिकारी यांनी खाजगी जागेवरील तसेच शासकीय जागेवरील अतिक्रमणे नियमानुकूल करण्यासाठी संबंधीत अधिकारी व झोपडपट्टी धारकांची बैठक घेवून हा प्रश्न निकाली काढण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे आता झोपडपट्टी धारकांना रूपयाही खर्च न करता जागा नावावर होण्याचा आणि सातबारा उतारा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. जागा नावावर करून देण्याच्या नावाखाली वर्गणी अथवा खंडणी मागणार्या दलालांना नागरिकांनी थारा देवू नये तसेच वर्गणीसाठी बळजबरी केल्यास थेट पोलिसात तक्रार करावी, असे आवाहनही आ. गोटे यांनी केले आहे.