मुंबई – राज्यात मुख्यत्वेकरून बहुतांश झोपडपट्टीधारक मराठी भाषीक आहेत. त्यांच्या तक्रारी व गाऱ्हाणी मराठी भाषेतून आल्यास एस.आर.ए.मधील उच्चस्तरीय समितीने त्या स्वीकाराव्यात, असे निर्देश गृहनिर्माण मंत्री प्रकाश महेता यांनी मंगळवारी दिले.
उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महाराष्ट्र सरकारच्या अधिपत्याखाली उच्चस्तरीय समितीचे गठन झाले आहे. या समिती अंतर्गत झोपडपट्टीधारकांच्या विविध तक्रारीबाबत न्यायनिवाडा केला जातो. पूर्वी या झोपडपट्टीधारकांच्या तक्रारी मराठी भाषेतून स्वीकारल्या जात होत्या. मात्र, आता इंग्रजी भाषेतूनच अर्ज सादर करण्याची मागणी होत आहे. त्यामुळे झोपडपट्टीधारकांना अडचणींना सामोरे जावे लागत होते. आता या उच्चस्तरीय समिती सामान्यजनांचे अपील, तक्रारी आणि गाऱ्हाणी मराठी भाषेतून स्वीकारेल. यामुळे सामान्य माणसांना दिलासा मिळणार आहे. याबाबत काही तांत्रिक अडचणी असतील तर त्या सोडविण्याचा प्रयत्न केला जाईल, असे महेता यांनी सांगितले.