झोपडपट्टीमधून सेवाशुल्क घेण्यास हरकत काय?

0

पुणे । शहरातील झोपडपट्ट्यांमध्ये राहणार्‍या नागरिकांमध्ये रस्ते, पाणी, ड्रेनेज, रस्त्यावरील प्रकाश व्यवस्था, साफसफाई, शाळा, आरोग्य अशा विविध सोईसुविधा देण्यात येतात. मात्र, त्यांच्याकडून पालिका सेवाशुल्क घेत नाही. त्यामुळे पालिकेच्या उत्पन्नाला वर्षाला पन्नास कोटींचा फटका होत आहे म्हणून झोपडपट्टीधारकांकडून हे सेवाशुल्क वसूल केले तर या नागरिकांचे राहणीमान आणि जीवनमान उंचावण्यासाठी अधिक सोईसुविधा देता येणार असल्याचे उपमहापौर डॉ.सिद्धार्थ धेंडे यांनी सांगितले.

शहरातील झोपडपट्टी भागातील व्यावसायिकांकडून सेवाशुल्क घेण्यास काहीच हरकत नाही. मात्र, सुस्तावलेले प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करीत आहे. 2000च्या अगोदरच्या झोपडपट्टीधारकांकडून सेवाशुल्क घेते. आणि त्यानंतरचा झोपडपट्टीधारकांना सेवा देऊनही सेवाशुल्क घेतले जात नाही. मागील 17 वर्षांत शहराच्या आजूबाजूला झोपड्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. शहरातील 42 टक्के लोकसंख्या या भागांत वास्तव्यास आहे.

मिळकतकर वसूल करताना ते घर परवानगी घेऊन बांधले की बिगर परवाना बांधले आहे, याचा विचार न करता मिळकतकर वसूल केला जातो. त्याच धर्तीवर ज्या झोपडपट्ट्यांना रस्ते, पाणी, ड्रेनेज, रस्त्यावरील प्रकाश, साफसफाई, शाळा, आरोग्य सुविधा अशा प्रकारच्या सेवा महापालिका देते. या सर्व झोपडट्टीधारकांकडून भेदभाव न करता सेवाशुल्क व पाणीपट्टी घेतली जावी, असा ठराव स्थायी समिती, प्रशासनाला देण्यात आला असताना, केवळ शासनाच्या आदेशाचे कारण पुढे करून सेवाशुल्क घेतले जात नाही. मात्र हे सेवाशुल्क घेण्यात यावे, यासाठी उपमहापौर डॉ.सिद्धार्थ धेंडे, ज्येष्ठ नगरसेवक बापूराव कर्णेगुरुजी यांनी सातत्याने प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू केला आहे. मात्र हा प्रस्ताव लालफितीत अडकून पडला आहे.

झोपडी नियमित होईल; पुनर्वसन योजनेसाठी फायदा
राज्यसरकारच्या कायदयानुसार सेवाशुल्क वसूल केले म्हणजे झोपडीधारकांची झोपडी नियमित मानली जाईल, असा होत नाही. हे सेवाशुल्क पावती पुनर्वसन योजनेच्या पात्रतेसाठी, राहिवासी, शासकीय पुरावा म्हणून ग्राह्य मानली जाणार नाही. त्यामुळे पुनर्वसनाच्यावेळी रहिवाशांना शासन दरबारी कागदपत्रांची पूर्तता करताना अडचण येणार नाही. झोपडपट्टीधारकांकडून हे सेवाशुल्क वसूल केले तर या नागरिकांचे राहणीमान आणि जीवनमान उंचावण्यासाठी अधिक सोईसुविधा देता येणार असल्याचे डॉ.सिद्धार्थ धेंडे यांनी सांगितले.