झोपडपट्टीवासीयांना न्याय मिळवाच!

0

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत अनेक लोक आपले जीवन अगदी बिनभरवशाचे जगतात. त्यामध्ये झोपडपट्टीतील नागरिकांचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. दोन दिवस मुंबईवरील चर्चेत अनेक आमदारांनी या झोपडपट्टीवासियांच्या समस्यां सभागृहात ठेवल्या. अगदी पोटतिडकीने या लोकांच्या समस्याच प्रतिनिधींनी मांडल्या. खरतर याचसाठी त्यांना इथं पाठवलं जात मात्र अनेक वेळा तसे होताना दिसत नाही. मात्र मुंबईवरील चर्चेत झोपडपट्टी वाल्या नागरिकांच्या एकूणच जगण्याविषयी प्राधान्याने चर्चा झाली. याला उत्तर देताना आज मुख्यमंत्र्यांनी भरघोस आश्वासने दिली आहेत. झोपड्यांच्या वर असलेलं बॅनर आणि कुडाचा बिनभरवशाचा आधार काढून त्यांना पक्का निवारा मिळावा यासाठी ते पिढ्यानपिढ्या पासून स्वप्न बघताहेत. मुख्यमंत्र्यांनी यावर बोलताना काही चांगल्या गोष्टी सांगितल्यात मात्र त्यावर अमलबजावणी तात्काळ होणे आवश्यक आहे.

मुंबईच्या विकास आराखड्यास मार्च अखेर मान्यता देण्यात येणार आहे. यामध्ये मुखत्वे कोळीवाडे, गावठाण आणि आदिवासी पाड्यांसाठी स्वतंत्र विकास नियंत्रण नियमावली तयार करण्यात येत आहे. मुंबईतील मुळ निवासी असलेले कोळी, आदिवासी बांधव यांच्या गावठाणांचे आणि पाड्यांचे सिमांकन केले जात आहे. त्यात जर काही गावठाण, पाडे सुटले तर मुंबई महापालिका आयुक्तांना प्राधीकृत करण्यात आले आहे. गावठाण, कोळीवाडे, पाड्यांसाठी स्वतंत्र विकास नियंत्रण नियमावली तयार करण्यात येत आहे. मुंबईत काही ठराविक ठिकाणी मच्छिमार बांधवांचे कोळीवाडे आणि मूळ रहिवाशी असलेले आदीवांसींचे पाडे आहेत. त्यांनाही चांगली घरे उपलब्ध करून देण्याची गरज असून त्यांच्या हद्दीचे सीमांकन करण्याचे काम हाती घेण्यात आली आहे. त्याचबरोबर शहरालगत असणाऱ्या झोपडपट्ट्यांना ज्या सीआऱझेड आणि नो डेव्हलपमेंट झोन मध्ये न येणाऱ्या झोपड्यांना गलिच्छ वस्ती म्हणून जाहीर करण्यात येणार आहे. त्याबाबतची माहिती केंद्राला पाठविण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी आज विधानसभेत बोलताना सांगितले आहे. या गोष्टींवर खरतर गाम्भीर्याने विचार होणे आवश्यक आहे.

आदी आज जाता-जाता अर्थमंत्री सुधीरभाऊंनी सेना-भाजपच्या ब्रेक अप नंतर पॅच अप करण्याच्या दृष्टीने महत्वाचे पाऊल टाकले आहे. राष्ट्रवादीकडून अशा संदर्भात कमेंट पास झाल्यावर अगदीच पुतनामावशीचे प्रेम दाखवीत भाऊंनी पुढच्या निवडणुका आम्ही एकत्रच लढविणार असल्याचे सांगत धमाका उडवून दिलाय. सामना वाचून वाचून तुमचा गैरसमज होतोय, असा टोमणाही यावेळी त्यांनी मारला. सुधीरभाऊंच्या या दाव्यानंतर आता शिवसेनेची भूमिका काय असेल याकडे लक्ष लागून आहे. मात्र खरेच असे झाले तर विरोधकांच्या लाइटा लागल्याशिवाय राहणार नाहीत.

-निलेश झालटे