झोपडपट्टी कायम करून उतारे देण्यात यावे अन्यथा ग्रामपंचायतीला टाळे ठोको आंदोलन

0

पीपल्स रीपब्लिकन पार्टीचे जिल्हा मंत्री जगन सोनवणे यांचा इशारा

भुसावळ- तालुक्यातील कंडारी ग्रामपंचायत अंतर्गत प्रभाग क्रमांक एक येथे ब्रिटीशकालीन झोपडपट्टी असून येथील रहिवाशांना ‘भारत सरकार’ या नावाने उतारा दिला जातो. यामुळे येथील रहिवाशांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवण्यासाठी अनेक अडचणीचा सामना करावा लागतो. यामुळे सर्वोच्च न्यायालय आणि राज्य शासनाने 1995 ते 2000 पूर्वीच्या झोपडपट्ट्या कायम करून रहिवाशांना त्यांच्या नावाने उतारे देण्यात यावे, अशी मागणी असून ग्रामपंचायतीकडून अंमलबजावणी होत नाही. ग्रामपंचायतीने ग्रामसभेच्या माध्यमातून रहिवाशांचा हा प्रश्‍न मार्गी लावावा अन्यथा पीपल्स रीपब्लीकन पार्टी व विविध दहा संघटनांच्या माध्यमातून कंडारी ग्रामपंचायत कार्यालयाला टाळे ठोको, आमरण उपोषण, रस्ता रोको अशा प्रकारचे आंदोलन जगन सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली केले जाईल, असे पीपल्स रीपब्लीकन पार्टीचे जिल्हा महामंत्री बबलू सिद्दीकी यांनी कंडारी ग्रामपंचायतीला दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे.निवेदनावर असंख्य झोपडपट्टी धारकांच्या स्वाक्षर्‍या आहेत.

विकासाची कामे होवूनही झोपडपट्टी नावावर का नाही ?
कंडारी ग्रामपंचायतीच्या प्रभाग क्रमांक एकमध्ये असलेले झोपडपट्टीधारक ग्रामपंचायतीचा रीतसर कराचा भरणा करतात तसेच या भागात शासनाच्या विविध योजनांची विकास कामेदेखील केली जात आहेत मात्र असे असूनही झोपडपट्टी नावावर का होत नाही? असा प्रश्‍न निर्माण होत आहे.