झोपडपट्टी धारकांच्या पुर्नवसनासाठी पायी मोर्चा

0

2 जून रोजी आयोजन ; मोर्चानंतर जेलभरो ; आंबेडकरी चळवळीचे किल्ले उद्ध्वस्त करण्याचे शासनाचे षडयंत्र !

भुसावळ- रेल्वे प्रशासनाने आपल्या हद्दीतील अतिक्रमण हटवण्यासाठी निर्णय घेतल्याने झोपडपट्टीधारक बेघर होवून रस्त्यावर येणार आहेत. राज्य शासनाने बेघर होवू घातलेल्या झोपडपट्टी धारकांचे पुर्नवसन करावे यासाठी सर्वधर्मीयांतर्फे भुसावळ ते जिल्हाधिकारी कार्यालय असा पायी मोर्चा 2 जून रोजी काढण्याचा ईशारा पत्रकार परीषदेत देण्यात आला. शहरातील आंबेडकरी चळवळीचे किल्ले उद्ध्वस्त करण्याचे शासनाचे षडयंत्र असल्याचे चळवळीचे नेते, रिपाइं गवई गटाचे जिल्हाध्यक्ष तथा माजी सभापती राजू सूर्यवंशी व पीपल्स रिपाइंचे जिल्हाध्यक्ष तथा माजी नगरसेवक जगन सोनवणे यांनी येथे सांगितले.
शासकीय विश्रामगृहात सर्वपक्षीय झोपडपट्टी बचाव समितीतर्फे गुरुवारी दुपारी पत्रकार परीषद घेण्यात आली.

राजकीय नव्हे, सामाजिक लढा -राजू सूर्यवंशी
राजू सुर्यवंशी म्हणाले की, झोपडपट्टीवासीयांचा लढा राजकीय नव्हे सामाजिक आहे. झोपडपट्टीवासीयांनी रेल्वेला अधिक बळकट करण्याचा प्रयत्न केला आहे. एकेकाळी रेल्वेला कर्मचार्‍यांची गरज असल्याने मोठ्या प्रमाणात भरती करण्यात आली. रेल्वेने अनधिकृतरित्या त्यांना झोपड्या बांधू दिल्या. गेल्या 100 वर्षांपासून ते तेथे वास्तव्यास असून सध्या गरीब, गरजू पर्यायी जागा नसल्याने विना वीज, पाणी खालच्यास्तराचे जीवन जगत आहे. समितीने नरक यातना भोगत असलेल्या लाभार्थींचे सर्व्हेक्षण केले आहे. राज्य शासनाकडे जागा व संबंधीत विभागाचा मोठा फौजफाटा असतांना बेघर होणार्‍या जनतेच्या जागेसाठी कुठलेही पुनर्वसनासाठी सर्व्हेक्षण होत नाही ही दुर्दैवी बाब आहे. ल्लित, मुस्लीम व गरीबांचे हे अतिक्रमण असल्याने सर्व दुर्लक्ष करीत आहे. शासनाला जागे करण्यासाठी येत्या 2 जून रोजी लाँग मार्च मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात येणार असून झोपडपट्टी हटविल्यास आंदोलने होतील, असेही राजू सूर्यवंशी यांनी स्पष्ट केले. पायी मोर्चात मोठ्या संख्यने झोपडपट्टीधारक सहभागी होणार असून मोर्चेकरांच्या जिवीतास धोका निर्माण झाल्यास याची जबाबदारी प्रशासनावर राहील, असेही ते म्हणाले.

चळवळ उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न -जगन सोनवणे
केंद्र व राज्य शासनाचे हे मोठे मनुवादी षडयंत्र असून संविधान बदलवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. अशा प्रसंगी आंबेडकरी जनसमुदाय रस्त्यावर येवू नये यासाठी त्यांनी संविधानवादी व आंबेडकरी चळवळीचे केंद्र उद्ध्वस्त करण्याचा घाट घातला आहे, अशी भावना पीआरपी प्रदेश महामंत्री जगन सोनवणे यांनी व्यक्त केली. ते म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची मंडळी आंदोलनाच्या माध्यमातून एकत्र आली आहे. राजकारण सोडून झोपडपट्टीवासीयांसाठी शुद्ध समाजकारण करुन 10 ठिकाणी रेलरोको आंदोलन केले. शासनाने नियमानुसार पुनर्वसन करायला हवे मात्र निर्णय लागत नाही. न्याय, हक्कासाठी येत्या 2 जून रोजी भुसावळ येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदान ते सातारा पूल, नाहाटा मार्गे सकाळी 11 वाजता जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य (पायी) लाँग मार्च मोर्चा काढण्यात येईल. मागण्या मान्य न झाल्यास व जागेचे सातबारा उतारे न मिळाल्यास जेलभरो आंदोलन व आमरण उपोषण सुुरु करणार आहोत.

नगरसेविकांचाही असेल सहभाग
2 जून रोजी शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मैदानावरून सकाळी 11 वाजता भुसावळ ते जळगाव असा पायी मोर्चा काढला जाणार आहे.या मोर्चात नगरसेविका पुष्पा जगन सोनवणे व नगरसेविका पुजा राजु सुर्यवंशी यांचाही मोर्चात सहभाग असणार असल्याचे पत्रकार परीषदेत सांगण्यात आले. दरम्यान, झोपडपट्टी धारकांना आधी पर्यायी जागा द्यावी व नंतरच अतिक्रमण हटवावे, या मागणी सर्व पदाधिकारी ठाम आहेत.

यांची होती उपस्थिती
राष्ट्रीय दलित पँथरचे सुदाम सोनवणे, राष्ट्रवादी अनुसूचित जाती आघाडीचे जिल्हा कार्याध्यक्ष मुन्ना सोनवणे, रिपाईचे जिल्हा उपाध्यक्ष शरद सोनवणे, मनोहर सुरडकर, मौलाना अजीम, बंटी रंधे, बरकत अली, बाळा पवार, प्रमोद तायडे, छोटू सुर्यवंशी, कैलास सुर्यवंशी, छोटू निकम आदी उपस्थित होते.