मुंबई । सन 2011 पर्यंतच्या झोपड्यांना कायदेशीर अधिकृत मान्यता द्यावी तसेच झोपडपट्टी पुनर्वसन योजनेमध्ये 400 स्क्वेअर फुटांचे घर देण्यात यावे या मागणीसाठी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवलेंच्या नेतृत्वातील रिपब्लिकन पक्षाच्या शिष्टमंडळाने सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. सन 2011च्या झोपड्यांना अधिकृत मान्यता देण्यासाठीचा कायदा बनविण्यात आला असून मान्यतेसाठी कायद्याचा प्रस्ताव राष्ट्रपतींकडे पाठविण्यात आला आहे. राष्ट्रपतींच्या मान्यतेनंतर सन 2011च्या झोपड्यांना कायदेशीर मान्यता देण्यात येईल अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रामदास आठवलेंना दिली. तसेच झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत किमान 30 मीटर ते 40 मीटर पर्यंतचे घर देण्याचा शासनाने निर्णय घेतला असून जेथे शक्य आहे तेथे 400 स्क्वेअर फूट घर देण्याचा निर्णय सुद्धा शासनाने घेतला असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी आठवलेंच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाला दिली.
खेड रत्नागिरी येथे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या झालेल्या विटंबनेप्रकरणातील समाजकंटकांना अटक करण्यासाठी सीआयडी चौकशी करण्याचा शासनाने निर्णय घेतला असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी रिपाइंच्या शिष्टमंडळाला दिली. या शिष्टमंडळात रिपाइंचे महाराष्ट्र्र प्रदेश अध्यक्ष भुपेश थुलकर, राष्ट्रीय प्रवक्ते अविनाश महातेकर, काकासाहेब खंबाळकर, सुरेश बारशिंग, पुण्याचे उपमहापौर डॉ सिद्धार्थ धेंडे, हनुमंत साठे, परशुराम वाडेकर, महेश शिंदे, बाळासाहेब जानराव, उमेश कांबळे, हेमंत रणपिसे, प्रवीण मोरे, मयूर बोरकर, महावीर सोनवणे,प्रशांत तोरणे, सोना कांबळे, घनश्याम चिरणकर, मान्यवर उपस्थित होते.