झोपडपट्यात बेकायदा नळ वारेमाप

0

महापालिका नगरसेवकांना आली पहिल्यांदाच जाग
पाणीपुरवठा अधिकार्‍यांनो कारवाई करा : स्थायी समितीचे आदेश

पिंपरी-चिंचवड : शहरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत नळजोड आहेत. पत्राशेड, झोपडपट्यांमध्ये तर हे प्रमाण वारेमाप असून त्यावर जोरदार कारवाई करा, असा आदेश स्थायी समिती सदस्यांनी पाणीपुरवठा विभागाच्या अधिकार्‍यांना दिला. तसेच ‘अभय’ योजनेअंतर्गत नळजोड अधिकृत करुन देण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या.

सर्व्हेक्षणाचे काम 40 टक्के पुर्ण
शहरात अधिकृत एक लाख नळजोड आहेत. तर, चार लाख मिळकती आहेत. पालिकेकडून 2012 पासून अधिकृत नळजोडून दिले जात नव्हते. त्यामुळे अनधिकृत नळजोड मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. अनधिकृत नळजोड सर्व्हेचे काम सुरु असून 40 टक्के काम पुर्ण झाले आहे. किती अनधिकृत नळजोडांवर कारवाई केली. याबाबतचा सविस्तर अहवाल पाणीपुरवठा विभागाकडून मागविण्यात आला आहे. तसेच पत्राशेड, झोपडपट्यांमधील अनधिकृत नळजोडवर कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, असा नगरसेवक विलास मडिगेरी यांनी सांगितले.

दिंडीप्रमुखांना तंबू भेट
महापालिकेच्या वतीने आषाढीवारीतील दिंडीप्रमुखांना दरवर्षी भेटवस्तू दिली जाते. महापालिकेतर्फे यंदा भेटवस्तू म्हणून ’तंबू’ देण्याचे विचाराधीन आहे. भेट वस्तू खरेदी करण्यासाठी पालिकेने त्वरित निविदा प्रक्रिया राबवावी, अशा सूचना देखील स्थायी समितीने दिल्या आहेत. दरम्यान, बक्षीस देण्यात येऊ नये असा राज्य सरकारचा निर्णय असल्याचे मुख्य लेखापाल राजेश लांडे यांनी सांगितले. परंतु, दिंडीप्रमुखांना भेट वस्तू देण्याची पंरपरा आहे. ती मोडू नये. कायद्याला धरुन भेट वस्तू देण्यात यावी, असा सूचना देखील करण्यात आल्या आहेत.

गरीब सहाय्य योजना
पुणे महापालिकेमध्ये गरीबांसाठी वैद्यकीय, सहाय्य योजना राबविली जाते. याच धर्तीवर पिंपरी-चिंचवड महापालिका देखील योजना राबविणार आहे. त्यासाठी पुणे पालिकेच्या या योजनेचा अभ्यास करुन त्याचा सविस्तर अहवाल स्थायीला देण्याच्या सूचना देखील करण्यात आल्या आहेत.