शेंदुर्णी । जिल्ह्यात पंचाय समिती, जिल्हा परिषद यांच्या निवडणुकींचे वारे वाहू लागले आहेत. मात्र, गेल्या 50 वर्षांपासून शेंदुर्णी येथून 6 किलोमीटर लांब असणार्या झोपडीतांडा वासीयांना आपला मतदानाचा हक्क बजविण्यासाठी 7.5 किलोमीटर मुख्य रस्त्याने किंवा 4.5 किलोमीटर जंगलातील शेतरस्त्यांने हिंस्त्र जंगली श्वापदापासुन बचाव करत व वृद्ध मतदारांना न सोसवणार्या हालअपेष्टा सहन करत मतदानासाठी लिहा येथे जावे लागते.
गेल्या 50 वर्षांपासून लिहा येथे करतात मतदान
याला कंटाळून झोपडीतांडा येथील नागरिकांनी जामनेर येथे तहसिलदार नामदेव टिळेकर यांची भेट घेवून गावातीलच जिल्हा परिषद शाळेत स्वंतत्र बुथ निर्माण करण्याची मागणी केली आहे. यावेळी प्रधान सुरा जाधव, भिमा शांताराम चव्हाण,बाबु भिला राठोड, श्रावण गुरमख चव्हाण,बद्री बालचंद पवार,आनंद छगन चव्हाण, जिवन हरचंद जाधव,विनोद ममराज राठोड,रोहीदास प्रल्हाद चव्हाण,भिवसींग हरसिंग चव्हान यांचेसह 40 मतदाराचे सह्या असलेले निवेदन तहसिलदार टिळेकर यांना देण्यात आले.
झोपडीतांडा येथील नागरिकांनी निवेदन दिल्यानंतर तहसिलदारांनी सकारात्मक भुमिका घेऊन पुढील कार्यवाहीसाठी तालुका मुख्य निवडणुक अधिकारी व प्रांतअधिकारी अभिजीत भांडे पाटील यांच्याकडे निवेदन रवाना केले आहे. लिहा येथील तलाठी अमोल कंवर यांनी झोपडीतांडा येथे जाउन तेथील मतदार संख्या व मतदान बुथसाठी आवश्यक प्राथमिक सोयी सुविधांची पाहणी करुन तसा अहवाल तहसिलदार जामनेर यांच्या कडे सपुर्द केला. त्यामुळे येणार्या जि.प.व पं.स. निवडुकीत गावातच मतदान करता यावे म्हणुन झोपडीतांडावासीय निवडणुक अधिकारी यांच्या सकारात्मक निर्णयाचे प्रतिक्षेत आहेत.