झोपडीधारकांना 445 चौरस फुटाची सदनिका द्यावी

0
कष्टकरी पंचायतीची मागणी
पिंपरी : पिंपरी -चिंचवड शहरातील सर्व झोपडपट्टी धारकांना पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत प्रति 445  चौरस फुट क्षेत्राची सदनिका देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. कष्टकरी कामगार पंचायतीचे कोषाध्यक्ष प्रल्हाद कांबळे, सरचिटणीस धर्मराज जगताप, कार्याध्यक्ष बळीराम काकडे यांनी याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले आहे. शहरात एकूण 71 झोपडपट्टया आहेत. त्यापैकी काही झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन चालू स्थितीत आहे. उर्वरीत कुटुंबनिहाय सर्व्हे करून शहरात किती लाभार्थी आहेत, त्यानुसार, पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत सर्व्हे करून घ्यावा. त्यामुळे झोपडपट्टीमुक्त शहर होऊ शकेल. एका कुटुंबाने इमारतीत रहायचे आणि दुसर्‍या कुटुंबाने झोपडपट्टीत आहे, त्याच ठिकाणी ठाण मांडून रहायचे, अशी परिस्थिती सध्या पुनर्वसन केलेल्या झोपडपट्टीत दिसून येते. याची गांभीर्याने दखल घेऊन 71 झोपडपट्टयांचा कुटूंबनिहाय सर्व्हे करून प्रत्येक लाभार्थींना 445 चौरस फुट क्षेत्राची सदनिका देण्यात यावी आणि आहे त्याच ठिकाणी पुनर्वसन करावे, असे निवेदनात म्हटले आहे.