झोपलेल्या पतीवर पत्नीने ओतले गरम तेल

0

पुणे । दारुची पार्टी करून झोपलेल्या पतीच्या अंगावर पत्नीने गरम तेल ओतल्याची घटना शनिवारी मध्यरात्री वानवडी परिसरातील सिक्रेट टाऊन सोसायटीत घडली. याप्रकरणी पोलिसांनी पत्नी जया भारत शेरसिया (वय 38) हिला अटक केली आहे. भारत अर्जुनराम शेरसिया (वय 26, रा. मुंबई) असे यामध्ये गंभीर जखमी झालेल्या पतीचे नाव आहे.

जयाचे भारत सोबत दुसरे लग्न झाले आहे. जया त्याच्यापेक्षा 12 वर्षांनी मोठी आहे. पहिल्या नवर्‍यापासून तिला 12 वर्षांची मुलगी आहे. त्यांचा प्रेमविवाह झाला होता. जया पुण्यात मोलमजुरीचे कामे करते. तर, भारत हा मूळचा मुंबईचा आहे. तो मुंबईत एका मोबाईल शॉपीमध्ये नोकरी करतो. जया पुण्यात राहत असल्याने भारत तिला भेटण्यासाठी येतो.

रागाच्या भरात ओतले तेल
शनिवारी जयाचा वाढदिवस होता. त्यामुळे तो आला होता. रात्री दोघांनी दारुची पार्टी केली. दारु पिताना त्यांच्यात किरकोळ वाद झाला. त्याचा जयाला राग आला होता. भारत झोपल्यानंतर त्याच रागातून तिने त्याच्या पोटावर, छातीवर व पायावर गरम तेल ओतले. भारत आरडा ओरडा करत घरा बाहेर आला. एका रिक्षा चालकाला थांबवून मदत मागितली. त्यावेळी रिक्षा चालकाला भारतला खाजगी रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर हा प्रकार समोर आला. दरम्यान दोघांमध्ये सतत वाद होत होते. तो तिला शिवीगाळ करत होता. त्यामुळे चिडून त्याच्या अंगावर गरम तेल ओतल्याचे जयाने पोलिसांनी सांगितले.

माझी चुक झाली, मला अटक करा
भारतच्या अंगावर तेल ओतल्यानंतर भारत जिवाच्या अंकाताने आरडा-ओरडा करू लागला. त्याचा त्रास जयाला पाहवला नाही. त्यामुळे तिला चूक झाल्याचा साक्षात्कार झाला. तिने थेट पोलीस ठाणे गाठले आणि माझी चूक झाली, मला अटक करा, असे म्हणून लागली. परंतु, पोलिसांना काहीच समजेना. जयाने मद्यपान केल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. त्यांनी विचारपूस केल्यानंतर तिने मी पतीच्या अंगावर गरम तेल ओतल्याचे सांगितले. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. मात्र, भारत तेथे नव्हता. जया दारुच्या नशेत बोलत असल्याचे पोलिसांना समजले. त्यामुळे पोलिसांनीही शोध बंद केला. मात्र, दुसर्‍या दिवशी ससून रुग्णालयातून पोलिसांना खबर आली. त्यानंतर हे प्रकरण बाहेर आले.