झोपू योजनेतील घोटाळा उघडकीस येवलेंना सुरक्षा द्या

0

मुंबई : विक्रोळी पार्कसाइट विभागात झोपू योजनेतील घोटाळा आणि एक कोटीची लाच प्रकरण चव्हाट्यावर आणणार्‍या सामाजिक कार्यकर्ते संदीप येवले यांच्या जीवाला धोका निर्माण झाला असून, त्यांना संरक्षण मिळावे तसेच या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मुंबई पूर्व उपनगराच्या जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. नितीन महाजन यांना तसेच पूर्व प्रादेशिक विभागाचे अप्पर पोलीस आयुक्त लखमी गौतम यांना मनसेतर्फे पत्र देण्यात आले आहे.

मनसेचे घाटकोपर पश्चिमचे नवनियुक्त विभागप्रमुख माजी नगरसेवक संजय भालेराव यांच्या नेतृत्वाखाली मनसेच्या कार्यकर्त्यांनी या अधिकार्‍यांची भेट घेतली. गेले चार दिवस संदीप येवले हे 40 लाख रुपये घेऊन मुंबईभर फिरत आहेत. तसेच त्यांनी काही मोठ्या नेत्यांची आणि विकासकांची नावेदेखील या प्रकरणात घेतल्याने विक्रोळी पार्कसाइट विभागात राहणार्‍या संदीप येवलेंना आता पोलिसांनी संरक्षण देण्याची गरज असेही त्यांनी नमुद केले. या वेळी माजी विभाग अध्यक्ष रवींद्र कोठावदे, अरुण मुळूक, शाखाध्यक्ष शरद भावे, प्रदीप वेंगुर्लेकर, राजू सावंत, सुनील सुर्वे आदी कार्यकर्ते उपस्थित होते..