पुणे । टँकरचा ब्रेक निकामी झाल्याने भीषण अपघात झाल्याची घटना वडगाव येथील नवले पुलाखाली शुक्रवारी दुपारी घडली. यात एका तरुणीचा मृत्यू झाला असून दोघेजण जखमी झाले आहेत. स्वाती मधुकर ओरके (वय 29) असे मृत महिलेचे नाव आहे.
कात्रजहून लुंकड ट्रान्सपोर्टचा सिमेंट काँक्रिट घेऊन जाणारा टँकर येत होता. तो नवले पुलाखाली आल्यानंतर भरधाव वेगातील टँकरचे ब्रेक निकामी झाले. त्यामुळे चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि तो थेट समोरील विश्व आर्केड कॉम्पलेक्सच्या आवारात घुसला. दोन वाहनांना धडक देत पाणीपुरी स्टॉलला उडवून तळमजल्यावरील सिरवी मिठाईवाले या दुकानात तो घुसला. यावेळी स्वाती नाश्ता करण्यासाठी तेथे आली होती. ती टँकरच्या समोरील चाकाखाली अडकल्याने तिचा मृत्यू झाला. पोलिस व अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले होते. या अपघातात अन्य दोनजणही जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे परिसरात बघ्यांची मोठी गर्दी जमली होती.