खासगी टँकर्सना जीपीएस प्रणाली बंधनकारक; प्रणालीवर फेर्यांची नोंद असेल तरच बिल मिळणार
पुणे : पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणार्या खासगी टँकर्सना देण्यात येणार्या भाड्यामध्ये राज्य शासनाने वाढ केली आहे. त्यानुसार आता प्रति किलोमीटर 4 रुपये 30 पैसे इतक्या दराने बिल खासगी टँकर्सना मिळणार आहे. मात्र, खासगी टँकरवर जीपीएस प्रणाली बसविलेली असेल व त्यावर ज्या टँकरच्या फेर्यांची नोंद होईल, त्याच फेर्यांची बिले शासनाकडून दिली जाणार आहे. जीपीएस प्रणालीच्या अटींमुळे बोगस टँकरच्या फेर्या दाखवून पैसे लाटणार्यांना आळा बसणार आहे.
पिण्याच्या पाण्याची टंचाई असलेल्या भागात टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येतो. मात्र टँकर व ट्रक्सद्वारे होणारा पाणीपुरवठा होणारा पाणीपुरवठा हा अत्यंत खर्चिक असल्याने अत्यावश्यक असलेल्या ठिकाणीच अशाप्रकारे पाणीपुरवठा करण्यात यावा. शक्यतो शासकीय टँकरचा वापर करावा, असे आदेश शासनाने दिले आहेत.
खासगी टँकरच्या दरामध्ये वाढ
उन्हाळ्यात टँकरची मागणी वाढते. त्यामुळे शासकीय टँकर अपुरे पडतात. त्यामुळे खासगी टँकर भाड्याने घ्यावे लागतात. खासगी टँकरचे भाडे 30 एप्रिल 2012 दरोजी शासनाने निश्चित केले आहेत. अतिदुर्गम भागात मोठे टँकर जाऊ शकत नाही, अशा ठिकाणी 3 ते 5 हजार लिटरचे छोटे टँकर पाठवावे लागतात. परंतु, छोट्या टँकरच्या मालकांना परवडत नसल्यामुळे या टँकरचे दर स्वतंत्रपणे ठरविण्याची मागणी होत होती. तसेच मागील सहा वर्षांत डिझेलच्या दरात व अन्य खर्चात झालेली वाढ विचारात घेऊन खासगी टँकरच्या दरामध्ये शासनाने वाढ केली आहे.
प्रतिदिन 338 रुपये भाडे
3 ते 5 हजार लिटरच्या टँकरसाठी पूर्वी कमाल प्रतिदिन भाडे 198 रुपये होते, ते आता 338 रुपये असे करण्यात आले आहे. तसेच प्रति किलोमीटर 2 रुपये 50 पैसे इतका दर होता त्यामध्ये आता वाढ करून 4 रुपये 30 पैसे प्रति किलोमीटर या दराने खासगी टँकरच्या मालकांना भाडे मिळणार आहे.
देयके मान्य न करण्याचे आदेश
पाणीपुरवठा करणार्या ज्या टँकरवर जीपीएस प्रणाली बसविलेली नाही किंवा जीपीएस प्रणाली बंद असल्याने टँकर वाहतूकधारकाने टँकरच्या फेर्या झाल्याचा दावा केला असल्यास अशा फेर्या मान्य करणार नाही. असेच जीपीएस प्रणालीची नोंद होत नाही म्हणून देयके मान्य करण्यात येऊ नये, असे आदेश शासनाने दिले आहेत.