जिल्हा परिषदेच्या जलसंधारण समितीच्या बैठकीत ठराव
पुणे : टँकर सुरू करण्याचे अधिकार तहसीलदारांकडून जिल्हाधिकार्यांकडे गेले आहेत. त्यामुळे हे अधिकार पूर्ववत करण्यात यावे, असा ठराव जिल्हा परिषदेच्या जलसंधारण समितीच्या बैठकीत करण्यात आला. त्यामुळे मागणी आल्यानंतर तत्काळ त्या गावांना टँकर सुरू होऊ शकतो. जिल्हा परिषद अध्यक्ष विश्वासराव देवकाते यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत जिल्ह्यातील पाणी टंचाई, उपलब्ध पाणीसाठ्याचा कशा पद्धतीने वापर करायचे, कोणती काळजी घेतली पाहिजे आणि भविष्यातील दुष्काळाला कसे तोंड द्यायचे, याबाबत सविस्तर चर्चा झाली. त्यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी नृसिंह मित्रगोत्री, बांधकाम सभापती प्रवीण माने, पांडुरंग पवार, वैशाली पाटील, अमोल नलावडे, शरद लेंडे यांच्यासह सदस्य आणि अधिकारी उपस्थित होते. राज्य शासनाकडून जिल्ह्यातील दहा गावांमध्ये दुष्काळ जाहीर केला आहे. मात्र, सद्य परिस्थितीमध्ये संपूर्ण जिल्ह्यात दुष्काळ परिस्थिती असल्यामुळे तेराही तालुक्यात दुष्काळ जाहीर करावा, यासाठी जिल्हाधिकार्यांना प्रस्ताव देण्याबाबत समितीने ठराव केला आहे. जिल्ह्यातील जलस्रोत सुरू राहण्यासाठी आणि तेथील पाण्याचे योग्य नियोजन आत्ताच करणे आवश्यक आहे.
एकजुटीने कामे करा
जिल्ह्यात दुष्काळी पार्श्वभूमीवर पाणी आणि जनावारांच्या चार्याचा वापर नागरिकांनी काटकसरीने करावा. त्याबाबत नागरिकांमध्ये प्रबोधन करण्यासाठी काय करता येईल याबाबत चर्चा करण्यात आली. तसेच या दुष्काळाची झळ कशी कमी करता येईल, याबाबत ठोस नियोजन आणि पाठपुरावा होणे गरजेचे आहे. त्यामध्ये अधिकारी आणि पदाधिकारी यांनी एकजुटीने काम करावे. जिल्ह्यात जलसंधारणाची कामे हाती घेण्यात येणार आहेत.
दरसूचीत तफावत
टंचाई आराखड्याअंतर्गत पाणीपुरवठ्याची करण्यात येणारी कामे आणि त्यासाठी वापरण्यात येणारा पाईप हा प्रत्यक्ष बाजारातील दर आणि दरसूचीतील दरामध्ये मोठ्या प्रमाणात तफावत असते. त्यामुळे ठेकेदार काम करत नाहीत. दरसूची आणि बाजारातील दर एकच असावेत, याबाबत अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकार्यांना पत्र दिले असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, जिल्हा परिषदेचे सदस्य पांडुरंग पवार यांनी शिंदेवाडी येथील जांबाचा डोह वडमळई येथे लघुपाटबंधारे तलाव करावा, अशी मागणी केली.