टंचाईग्रस्त गावात टँकरने पाणी द्या!

0

चाळीसगाव । पिण्याच्या पाण्याचे कोणतेही स्त्रोत नसलेल्या टंचाईग्रस्त गावांना टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात यावा, यासाठी संबंधीत गावाच्या सरपंचांनी आपले प्रस्ताव त्वरित सादर करावे अशा सूचना आमदार उन्मेश पाटील यांनी दिल्या. चाळीसगाव तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांची समस्या निवारण्यासाठी तहसील कार्यालयात आमदार उन्मेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सरपंच, तलाठी, ग्रामसेवक यांची बैठक घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. या बैठकीस तहसीलदार कैलास देवरे, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अतुल पाटील, निवासी नायब तहसिलदार नानासाहेब आगळे, जि. प. ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता आर. सी. पाटील आदी उपस्थित होते.

गावांनी मदतीचा हात द्यावा!
आमदार उन्मेश पाटील म्हणाले की, ज्या गावात पाण्याचे स्त्रोत चांगले आहेत त्या गावांनी इतर गावांना पिण्यासाठी पाणी द्यावे. यासाठी सरपंच व ग्रामसेवक यांनी चर्चेतून हा प्रश्‍न सोडवावा. तसेच आवश्यक असल्यास टंचाई काळासाठी पाणी देण्याबाबत करार करण्यात यावा. टंचाईग्रस्त गावाच्या समस्या निवारणासाठी करावयाच्या उपाय योजनांचे प्रस्ताव सरपंच, ग्रामसेवकांनी त्वरीत प्रस्ताव सादर करावे. नादुरुस्त हातपंप दुरुस्त करुन घ्यावेत. वाघळी गावात सुरु असलेले मुख्यमंत्री पेयजल योजनेचे काम त्वरीत पूर्ण करावे अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

प्रस्तावांना मंजूरी: तहसीलदार कैलास देवरे यांनी सांगितले की, तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांच्या समस्या निवारण्यासाठी प्रस्ताव 31 मार्चपूर्वी जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर होऊन मंजूर झाले असून त्याप्रमाणे उपाययोजना करण्यात येत आहेत. काही गावांचे पाण्याचे स्त्रोत कमी झाल्यामुळे उपाययोजना करण्यास अडचणी येत आहेत. अशा गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. करजगाव, न्हावे, ढोमणे, वाघळी, रोहिणी, शिंदी, चत्रभुज तांडा, भिल्ल वस्ती ग्रा.पं.हातगाव या गावांना पाणी टंचाई निवारण्यासाठी उपाययोजना सुरु आहेत. तसेच काही गावात विहीरी अधिग्रहीत करण्यात आल्या आहेत. सरपंच गोरख राठोड यांनी शिंदी गावात पाण्याची कोणतीही योजना कार्यान्वित नाही. त्यामुळे या गावाचा राष्ट्रीय ग्रामीण पाणी योजनेत समावेशाची मागणी केली.

सरपंचांचे दातृत्व
डामरुण गावाचे सरपंच अभिमन्यू चिंतामण पाटील यांनी लिंबू बागेचे पाणी बंद करुन स्वत:च्या विहिरीतून स्वखर्चाने जलवाहिनी टाकून गावातील लोकांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून दिले आहे. विहीरीत पाणी असेपर्यंत गावात पाणी टंचाई भासणार नसल्याचेही त्यांनी सांगितले. या कामाबाबत आमदार उन्मेश पाटील यांनी सरपंच अभिमन्यू पाटील यांचे कौतुक केले. यावेळी वाघळी, डामरुण, चितेगाव, राजदेहरे, घोडेगाव, पिंपळगाव, रोहीणी, अंधारी, हातगाव, सांगवी, हातगाव भिल्लवस्ती यासोबत इतर गावांच्या पाणी टंचाईवर उपाययोजना करण्याबाबत चर्चा करण्यात आली.