टंचाईच्या चटक्यांपूर्वीच पाणीटंचाईचे प्रस्ताव तयार करा

0

माजी मंत्री एकनाथराव खडसेंची सूचना ; मुक्ताईनगरात आढावा बैठक

मुक्ताईनगर-आतापासुनच गावात संभावणार्‍या पाणीटंचाईचे प्रस्ताव तयार करावेत, पाणी कमी होईल असे समजताच टँकरची मागणी करावी, 14 व्या वित्त आयोगातून पाणीपुरवठ्यावर खर्च करावा, पाणीपुरवठ्याच्यावेळी वीजपुरवठा खंडीत करू नये अशा सूचना माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी वीज वितरण कंपनीच्या अधिकार्‍यांना केल्या. तहसील कार्यालयाच्या सभागृहात 11 रोजी गुरूवारी पाणीटंचाई आढावा बैठक आमदार एकनाथ खडसे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. प्रसंगी खडसे यांनी चिंचखेडा खुर्द येथील जुनी पाईपलाईन योजनेत अपहार झाला होता, त्याचे पुढे काय झाले, असे विचारत दोषींवर गुन्हे दाखल करा, असे सांगत गावातील गायरान किंवा शासकीय जमीन ग्रामपंचायतीने वीज वितरणला दिल्यास त्या जागेवर सौरशक्ती वर चालणारी वीज तयार केली जाणार असल्याचे ते म्हणाले. ही वीज गावाला देण्यात येणार आहे .

या गावांना बसणार टंचाईचे चटके
चिंचखेडा खुर्द, पारंबी येथे विहिर खोलीकरण, काकोडा, वढोदा, कासारखेडा, वढवे येथे तात्पुरती पाणीपुरठा योजना, अंतुर्ली व चिंचोल येथे हातपंप घेणे, हरताळा, चारठाणा, मधापुरी येथे टँकरने पाणीपुरवठा करणे, नांदवेल, डोलारखेडा, मन्यारखेडा, धामणगाव तांडा येथे विहिर अधिग्रहण करण्याबाबत माहिती देण्यात आली.

यांची बैठकीला उपस्थिती
माजी मंत्री एकनाथराव खडसे, तालुका समन्वय समिती अध्यक्ष निवृत्ती पाटील, पंचायत समिती सभापती शुभांगी भोलाणे, तहसीदार शाम वाडकर, गटविकास अधिकारी डिगंबर लोखंडे, जिल्हा परीषद सदस्य निलेश पाटील, वैशाली तायडे, पंचायत समिती सदस्य विकास पाटील , सुवर्णा साळुंके यांची उपस्थिती होती. सूत्रसंचलन तालुका कृषी अधिकारी बाळासाहेब व्यवहारे यांनी केले.