टंचाईवर मात करण्यासाठी तात्काळ उपाययोजना करा!

0

धुळे । तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांतील वाढत्या समस्यांवर मात करण्यासाठी तात्काळ उपाययोजना कराव्यात, अशा सुचना केंद्रीय संरक्षण राज्य मंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी शनिवार, 5 रोजी दिल्या. पंचायत समिती कार्यालयात आयोजित टंचाई आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी पं.स. सभापती अनिता पाटील, जि.प. चे कार्यकारी अभियंता बी.एस. पड्यार, गट विकास अधिकारी सी.के. माळी, सहाय्यक गट विकास अधिकारी श्री. सोनवणे, शाखा अभियंता एन.डी. पाटील, बापू खलाणे, प्रा. अरविंद जाधव, मनोहर भदाणे, प्रभाकर पाटील, राम भदाणे उपस्थित होते.

आठ दिवसात अहवाल सादर करा
यावेळी बोलतांना मंत्री डॉ. भामरे म्हणाले की, पाणीटंचाई हा अतिशय जिव्हाळ्याचा विषय असून या कामासाठी प्रशासनातील प्रत्येक घटकाने टंचाईग्रस्त गावातील गावकर्‍यांना न्याय देण्याचे काम करावे. विविध ग्रामपंचायतींनी सुचविलेल्या उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करून आठ दिवसात प्रगती अहवाल सादर करण्याच्या सुचनाही त्यांनी यावेळी केल्या. यावेळी टंचाईग्रस्त गावातील सरपंच, पदाधिकारी व ग्रामसेवकांनी टंचाई निवारणार्थ विहीर अधिग्रहण करणे, टँकरने पाणी पुरवठा करणे, तात्पुरती पुरक योजना, विंधनविहिर करणे, विहिर खोलीकरणासह आडवे बोअर करणे आदी उपाय योजना प्रस्तावित केल्या तर प्रस्तावित योजनांची तात्काळ अंमलबजावणी करण्याच्या सुचना मंत्री डॉ. भामरे यांनी ग्रामीण पाणी पुरवठा यंत्रणेला यावेळी दिल्या. यावेळी जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता बी.एस. पड्यार यांनी टंचाई निवारणार्थ प्रशासनामार्फत राबविण्यात येणार्‍या उपाययोजनांची सविस्तर माहिती दिली.