बोदवड । जिल्ह्यातील 95 पाणीपुरवठा योजनांचा मुळ अंदाजपत्रकात बदल करुन वाढीव अंदाजपत्रक करण्यात आली. या 95 योजनांची कामे संशयाच्या भोवर्यात असून बोदवड तालुक्यातील जलचक्र बु. ग्रामपंचायतीच्या पाणी समिती अध्यक्ष व सचिवाने मुळ अंदाजपत्रक 41 लाख 1 हजार ऐवजी 61 लाख 88 हजार म्हणजेच 20 लाख 87 हजार वाढीव करण्यात आले. याचा माहितीचा अहवाल नाशिक विभागीय आयुक्त कार्यालय यांनी मागविला होता. मात्र यावर पुढे काय कारवाई झाली हे अद्यापही गुलदस्तात आहे. तालुक्यातील बर्याच गावातील वितरण व्यवस्थेचे कामे अपुर्ण अपूर्ण आहे. ओडीएची जूनी पाइपलाईन दाखवून कामे पुर्ण केल्याचे दाखविले आहे. यावरुनच तालुक्यातील पाणी टंचाईवर केवळ अधिकारी आणि ठेकेदारांचीच टंचाई दूर झाली असून पाणी टंचाई मात्र अद्यापही कायम आहे.
बनावट सातबारा उतारे जोडून घेतला विजपुरवठा
काही गावात विहीरीचे खोदकाम पूर्ण झाले आहे. परंतु त्या विहीरींची अधिकृत नोंद उतार्यावर नाही. काही महाभाग अध्यक्ष व ग्रामसेवकांनी बनावट सातबारा उतारे जोडून विजपुरवठा घेतला आहे. मुबलक पैसा समितीला मिळून सुध्दा जलचक्र बु. ची विहीरीचे खोदकाम 35 फुटापेक्षा कमी आहे. ज्या गावांमध्ये भारत निर्माण योजना मंजूर झाली. ते गाव संपुर्ण हागणदारीमुक्त झाल्याशिवाय पाणीपुरवठा विभागाने अंतीम हप्त्याचा निधी देवू नये अशा सुचना असतांना सुध्दा पाणी पुरवठा कार्यकारी अभियंत्यांनी कसा काय अंतिम हप्ता वितरीत केला. हे खूप मोठे गौंडबंगाल आहे. ज्या गावात राष्ट्रीय पेयजल भारत निर्माण पाणी पुरवठा योजना झाल्या आहेत. ते पुर्ण गाव कागदोपत्री हगणदारीमुक्त झाले आहे. तरी पुन्हा त्या गावांमध्ये स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शौचालय बांधणे सुरु आहे.
खोटा पाणी टंचाई अहवाल सादर करुन 8 कोटी 65 लाख गेले पाण्यात
भूजल सर्वेक्षण विभागाने शासनाची फसवणूक करुन खोटा पाणी अहवाल सादर करुन 8 कोटी 65 लाख पाण्यात गेले. 2015- 16 मे अखेर ग्रामपंचायतनिहाय भारत निर्माण योजना पुर्ण व राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम अंतर्गत मंजूर निधीत हरणखेड 29 लाख, मनूर बु. 34 लाख 34 हजार, आमदगाव 24 लाख 63 हजार, चिंचखेडासिम 15 लाख 68 हजार, लोणवाडी 24 लाख 59 हजार, सोनोटी 1 लाख 63 हजार, घाणखेडा 18 लाख 32 हजार, चिखली – शेवगे बु. 30 लाख 37 हजार, शिरसाळे 14 लाख 21 हजार, कुर्हा हरदो 31 लाख 49 हजार, शेवगे खुर्द 7 लाख 81 हजार, निमखेड 18 लाख 89 हजार, मनूर खुर्द 17 लाख 39 हजार, वराड बु. 15 लाख 63 हजार, साळशिंगी 26 लाख 58 हजार, करंजी पाचदेवळी 40 लाख 53 हजार, विचवे 18 लाख 35 हजार, कोल्हाडी 38 लाख 54 हजार, सुरवाडे खुर्द 26 लाख 43 हजार, राजूर 32 लाख 83 हजार, गोळेगाव 31 लाख 5 हजार, भानखेड प्रबो 27 लाख 89 हजार, नाडगाव 48 लाख 97 हजार, मुक्तळ 33 लाख 94 हजार, चिचखेड 19 लाख 7 हजार, वाकी 25 लाख 83 हजार, सुरवाडे बु. 44 लाख 50 हजार, येवती रेवती 49 लाख 34 हजार, नांदगाव 48 लाख 94 हजार असे एकूण 8 कोटी 65 लाख 62 हजार खर्च झाल्याचे दिसून येते.