टक्केवारीची तक्रार पालिकेने केली ’क्लोज’!

0

पिंपरी-चिंचवड : महापालिकेतील अधिकारी विविध कामांच्या बिलांचे पैसे अदा करण्याच्या बदल्यात ठेकेदारांकडून 3 टक्के रक्कम मागतात, अशी तक्रार पुण्यातील एका ठेकेदाराने पंतप्रधान कार्यालयाच्या संकेतस्थळावर केली होती. त्यानंतर महापालिकेने तक्रारदाराकडे यासंदर्भात पुरावा मागितला होता. मात्र, पुरावा आपण पंतप्रधान कार्यालयाकडेच देणार आहे, असे तक्रारदाराने महापालिकेला सांगितले. त्यामुळे महापालिकेने ती तक्रार ’क्लोज’ केली आहे.

तक्रारीनंतर आरोप-प्रत्यारोपांची राळ
ठेकेदाराने केलेल्या तक्रारीची दखल पंतप्रधान कार्यालयाने घेतली होती. त्यानुसार महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडून खुलासा मागितला होता. यामुळे महापालिका वर्तुळ आणि शहराच्या राजकारणात एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच जुंपली होती. मोठ्या प्रमाणात राजकीय-आरोप प्रत्यारोपांची राळ उठली होती. आयुक्त हर्डीकर यांनी संबंधित अधिकार्‍यांकडून खुलासा मागितला. त्यावर प्रशासकीय कारवाई करण्यात आली. तक्रारकर्त्याकडून पुरावे मागितले होते. परंतु, तक्रारकर्त्याने महापालिकेला पुरावे देण्यास नकार दिला. आपल्याकडील पुरावे थेट पंतप्रधान कार्यालयाकडे देणार आहोत, असे त्यांनी महापालिकेला कळविले आहे. त्यामुळे ती तक्रार ’क्लोज’ करण्यात आली आहे.

कायदेशीर करण्याच्या सूचना
याबाबत बोलताना आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले की, या तक्रारीवर प्रशासकीय कारवाई केली आहे. तक्रारदाराला पुरावे देण्याचे सांगितले होते. त्यासाठी त्यांना संधीदेखील दिली होती. परंतु, त्यांनी पालिकेला माहिती दिली नाही. पंतप्रधान कार्यालयाकडेच आपण पुरावा देणार आहे, असे त्यांनी कळविले आहे. त्यांनी जे उत्तर दिले आहे. ते पंतप्रधान कार्यालयाच्या संकेतस्थळावर पाठविण्यात येईल. तक्रारदाराने पुरावे दिले नाही तर पालिकेची बदनामी केली म्हणून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, असे निर्देश स्थायी समितीने दिले आहेत. त्यावर कायदेशीरबाबींचा तपास करून उचित कारवाई केली जाईल, असेही आयुक्त हर्डीकर यांनी सांगितले.