पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या शिक्षण मंडळाच्या एका माजी प्रभारी प्रशासन अधिकार्याने टक्केवारीसाठी ठेकेदारांकडे तगादा लावला असल्याचे कळते. संबंधित अधिकार्याची चार महिन्यांपूर्वीच बदली झालेली असून ठेकेदार त्याला टक्केवारी देण्यास नकार दर्शवित आहेत. दरम्यान, या विभागात सदस्य, अधिकारी अशा प्रत्येकालाच टक्केवारी दिल्याशिवाय पानही हालत नसल्याबाबत चर्चा होत आहे. मात्र, या प्रकाराबाबत चर्चेने जोर पकडला असला तरी कोणताही अधिकृत दुजोरा मात्र मिळू शकलेला नाही.
शिक्षण मंडळाच्या अब्रुचे धिंडवडे
पिंपरी-चिंचवड महापालिका शिक्षण मंडळ जूनअखेर बरखास्त होणार असून शिक्षण मंडळाचा सन 2017-18 या आर्थिक वर्षातील अर्थसंकल्प महापालिका अर्थसंकल्पात समाविष्ट करण्यात आला आहे. मागील वर्षी शिक्षण मंडळाकडून 131 प्राथमिक शाळांच्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे मोफत वाटप केले आहे. या साहित्य खरेदीसाठी कोट्यवधी रूपयांची तरतूद करून ती रक्कम खर्च केली. त्यानुसार शिक्षण मंडळाने शाळा प्रवेशानंतर जूनच्या पहिल्या आठवड्यात साहित्य वाटपास प्रारंभ केला. मनपाच्या सर्व शाळांमध्ये ऑक्टोबर महिन्यापर्यंतच्या विहित नमुन्यात हे साहित्य ठेकेदारांनी वितरित केले. यानंतर सर्व ठेकेदारांनी ही बिले शिक्षण मंडळाला सादर केली. ही बिले निघेपर्यंत संबंधित अधिकार्याची इतरत्र बदली झाली त्यामुळे त्याला टक्केवारी मिळाली नाही. ती आपणास मिळावी म्हणून संबंधित ठेकेदारांकडे त्याने तगादा लावल्याचे समजते. या प्रकारामुळे मात्र शिक्षण मंडळाच्या अबु्रची लक्तरे वेशीला टांगली गेली आहेत.
या वस्तुंवर एवढा खर्च
गत आर्थिक वर्षात शिक्षण मंडळाने महापालिकेच्या प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांना गणवेश, स्वेटर, पीटी गणवेश, कंपास, पुस्तके, वह्या, बूट, सॉक्स, रेनकोट आदी वस्तुंचे वाटप केले होते. यासाठी गणवेश खरेदीला 5 कोटी, पीटी गणवेशसाठी 1 कोटी 90 लाख, खेळ गणवेशासाठी 90 लाख, स्काऊटगाईड गणवेशासाठी 5 लाख, स्वेटर 1 कोटी 90 लाख, पादत्राणे व सॉक्स 95 लाख, पीटी शूज 30 लाख, दप्तरे व पाट्यांसाठी 80 लाख, पावसाळी साधनांसाठी 1 कोटी 25 लाख, वह्या खरेदीस 75 लाख अशी कोट्यवधी रूपयांची तरतूद खर्ची टाकण्यात आलेली आहे.