टक्केवारीवर गुणवत्ता ठरवू नका; कलागुण ओळखा

0

डॉ. अविनाश धर्माधिकारी यांचे आवाहन

नवी सांगवी : जीवनात कोणत्याही क्षेत्रात जाण्यासाठी केवळ कागदावरचे मार्क महत्वाचे नाहीत. टक्केवारीवर गुणवत्ता ठरवू नका. स्वतःमधील कलागुण ओळखा. उच्च गुण प्राप्त करणारा विद्यार्थी जीवनात यशस्वी होतोच असे नाही. यासाठी बुद्धीमत्ता आवश्यक आहे. आपली बुद्धीमत्ता कोणत्या क्षेत्रात चालते हे ओळखता आले, तर खर्‍या अर्थाने तुमच्या करियर वाटा मोकळ्या होतील. गुणवत्तेबरोबर बुद्धीमत्ता महत्वाची असते, असे मत माजी सनदी अधिकारी डॉ. अविनाश धर्माधिकारी यांनी विद्यार्थ्यांसमोर मार्गदर्शन करताना व्यक्त केले. जिजाई प्रतिष्ठानच्यावतीने पिंपळेगुरव येथील नटसम्राट निळू फुले नाट्यगृहात आयोजित कार्यक्रमात दहावी आणि बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना डॉ. अविनाश धर्माधिकारी यांनी करियरविषयी मार्गदर्शन केले. यावेळी भाजपचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप, आमदार महेश लांडगे, जिजाई प्रतिष्ठानच्या संस्थापिका व स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा सीमा सावळे, नगरसेविका आशा शेंडगे-धायगुडे, माधवी राजापुरे, करूणा चिंचवडे, नगसेवक कैलास बारणे, शत्रुघ्न काटे, हर्षल ढोरे, अंबरनाथ कांबळे, माजी नगरसेवक विजय लांडे, राजेंद्र राजापुरे, भाजपचे शहर सरचिटणीस सारंग कामतेकर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे सिनेट सदस्य संतोष ढोरे, तानाजी धायगुडे, संजय शेंडगे यांच्यासह विद्यार्थी, पालक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी आमदार लक्ष्मण जगताप यांनी मनोगत व्यक्त करत दहावी आणि बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

आवड लक्षात घेऊन निवड करावी
प्रा. धर्माधिकारी पुढे म्हणाले की, इंजिनिअरिंग, मेडिकल, मॅनेजमेंट, सीए या अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा कल वाढला आहे. हे क्षेत्र करियरच्यादृष्टीने अतिशय महत्त्वाचे समजते जाते. मात्र विद्यार्थ्यांमध्ये या अभ्यासक्रमांसंदर्भात रूची नसेल, मित्रांच्या अथवा पालकांच्या दबावात विद्यार्थी या क्षेत्राची निवड करत असतील, तर त्या विद्यार्थ्याचे करियर धोक्यात राहिल. त्यामुळे विद्यार्थ्यांनी सर्वप्रथम आपली योग्यता, परिश्रम करण्याची तयारी, आवड हे लक्षात घेऊन करियरची निवड करावी. जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी गुण हे सर्वस्व नाहीत. पालकांनी आपल्या मुलांना करियर निवडण्याची आणि घडविण्याची मुभा द्यावी. त्याला जे क्षेत्र आवडते, त्या क्षेत्रामध्ये उत्तुंग कामगिरी करण्यासाठी प्रोत्साहित करावे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय शेंडगे, प्रा. संतोष पाचपुते यांनी केले. प्रास्ताविक स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा सीमा सावळे यांनी केले. तर नगरसेविका आशा शेंडगे-धायगुडे यांनी आभार मानले.