पिंपरीतील डीवाय पाटील रस्त्यावर महापालिका आणि पोलिसांचा निष्काळजीपणा
माजी नगरसेवक जितेंद्र ननावरे यांचा आरोप
पिंपरी-चिंचवड : भारताचे उपराष्ट्रपती व्यंकया नायडू यांच्या पिंपरीतील डॉ. डी. वाय. पाटील महाविद्यालयाच्या दौर्याच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड महापालिकेने मंगळवारी अचानक संत तुकारामनगर डॉ. डी. वाय. पाटील रोडवरील अनधिकृत टपर्या आणि पत्राशेडवर कारवाई केली. दरम्यान, या कारवाईला विरोध करणार्या एका टपरीचालकाला अतिक्रमण विभागाच्या अधिकार्यांनी आणि पोलिसांनी धक्काबुक्की केली. त्यामुळे हृदविकाराचा झटका येऊन त्याचा मृत्यू झाला असल्याचा आरोप, माजी नगरसेवक जितेंद्र ननावरे यांनी केला आहे. संबंधित अधिकार्यांवर कारवाई होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात नसल्याची भूमिका त्यांनी घेतली होती.
अनुचित प्रकार घडला नाही
रवी रायभान तायडे ( वय 52, रा. महात्मा फुलेनगर, भोसरी) असे टपरीचालकाचे नाव आहे. दरम्यान, ‘ह’ क्षेत्रिय कार्यालयाच्या अधिकारी आशा राऊत म्हणाल्या, पिंपरीतील अनधिकृत पत्राशेड आणि टपर्यांवर कारवाई केली आहे. कारवाईदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. अधिकार्यांनी कोणालाही धक्काबुक्की केली नाही
हृदयविकाराचा झटका
‘ह’ विभागाच्या अतिक्रमण विभागाने संत तुकारामनगर डॉ. डी. वाय.पाटील रोडवरील अनधिकृत टपर्या आणि पत्राशेडवर कारवाई केली. रवी तायडे याचे याठिकाणी रद्दी खरेदी विक्रीचे दुकान होते. अतिक्रमण निर्मूलन पथकाकडे वेळ मागितला होता. तरीपण, कारवाईला सुरवात केली. त्यात त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांना तातडीने वायसीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान तेथे त्यांचा मृत्यू झाला
धक्काबुक्की झाल्याचा आरोप
याबाबत माजी नगरसेवक ननावरे म्हणाले, उपराष्ट्रपतींचा दौरा महिन्याभरापूर्वी ठरला होता. तरीदेखील पालिका प्रशासनाने काल अचानक टपर्या चालकांना नोटीसा दिल्या. तसेच आज दुपारी दोन वाजेपर्यंत टपर्या काढून घेण्याचे सांगितले होते. त्यानुसार टपरीचालक स्वत:हून टप-या काढत होते. परंतु, दुपारी दोनच्या सुमारास अचानक पालिकेचे पथक तिथे दाखल झाले. त्यावेळी टपरीचालक रवी तायडे यांच्याशी अधिकार्यांनी धक्काबुक्की केली. त्यामुळे तायडे यांना हृदविकाराचा झटका आला. त्यांना वायसीएममध्ये दाखल करण्यात आले होते. रात्री उशिरा त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.