जीभाऊ आज बाजारात जाऊन आल्यापासून भडकलेलेच होते. नुसतीच चडफडत चालली होती. एकेकाचा उद्धारही करून झाला. जीभाऊ मोठ्या खुशीत गेले होते चार चांगल्या गोष्टी आणायला पण चक्क हात हालवत परत आले होते. कारण काय तर म्हणे आजचा अख्खा बाजारच नासका निघाला. जीभाऊ बाजारात पोहोचले तो पहिली हाक त्यांच्या कानावर आली, ‘घ्या होऽऽ घ्या, कोल्हापुरी टरबुजं घ्या. गोल-गरगरीत, रसाळ, मधाळ एकदा खाऊन पहा, प्रेमात पडाल. आणखी घेऊन जाल. घ्या होऽऽ घ्या, कोल्हापुरी टरबुजं घ्या.’ विक्रेता मस्तपैकी पटवत होता. आपले जीभाऊ चक्क भुलले नां. त्यांनी द्या द्या करत चांगलं मोठंस टरबुज घेतलं, 20 पावलं पुढे आलं पण अचानक मनात काय आलं कोणास ठाऊक अन् जीभाऊ पुन्हा त्या विक्रेत्याकडे गेले. ऐ बाबा, हे टरबूज जरा कापून दाखंव की, त्यावर तो विक्रेता नाही बोलला. त्याने हात वर केले. एकदा घेऊन गेलात नां. आता नाही. झालं, तिथेच दोघांमध्ये वाद झाला. टरबूजवाल्याने हे फळ आपलं नाहीच, खराब निघालं तर पैसेही परत मिळणार नसल्याचे सांगत टरबूज कापून दाखवलं तर नासकं निघालं. त्याने ते तसंच जीभाऊंच्या समोर धरलं. हे आपलं नाही. तुम्ही दुसरीकडून घेतलं असेल, घेऊन जा. जीभाऊ काय करणार ? त्यांनी ते कोल्हापूरी टरबूज बाजूला टाकून दिलं. बाजाराची सुरुवातच खराब झाली म्हणा नां. जीभाऊ मनातून चरफडले. टरबुजापायी चांगलाच ताप झाला. वर पैसेही गेले.
डोकं शांत करत जीभाऊ पुढे निघाले तर त्यांना जामनेरी काकडी विकणारा दिसला. तोही ओरडत होता, घ्या-घ्या. एकदम रसदार, चवदार अस्सल काकडी. आपल्या जामनेरची आहे. पण यावेळी जीभाऊ भुलले नाहीत. काकडी वरून तर ताजी दिसत होती. पण पाणीही मारलेलं होतं. ते चमकत होतं. जीभाऊंनी शहाणपणा दाखवत काकडी हातात धरून पाहिली तर वजनच लागेना. फोफसा, नासका माल निघाला. एकदम डुप्लिकेट. जीभाऊंनी नको रेऽऽ भाऊ तुझी काकडी, काही कामाची नाही. नुसतीच दिसायला चांगली आहे. तुझ्याकडेच ठेव, असं सांगत आपला मोर्चा पुढे वळवला. टरबूज नाही, काकडीही नाही तर जरा दुसरं तरी बघू म्हणून जीभाऊ जरा मान उंचावून पाहू लागले तर पलीकडे त्यांना कांदे-बटाटे दिसले. चला, आज झणझणीत रस्सा तरी करूया. मनातल्या मनात मांडे खात जीभाऊ कांदे-बटाटे घ्यायला गेले. पण कसंच काय ? कांदा पक्का नव्हता. ओलसर लागत होता. काही तर हातातून निसटून खाली पडलेही. बटाट्यांचीही तीच गत. काळे पडले होते. काहींना कोंब फुटले होते. त्यांनी बरीच माती खाल्लेली होती. एक दिवसही टिकणारे नव्हते. शिवाय त्यांचा कुजका वासही येत होता. जीभाऊंचे डोकं भलतंच गरगरलं. सगळा बाजारच नासका निघाला होता. काहीच नको म्हणत, तसेच हात हलवत घरी परतले.
(कृपया, ‘नासक्या बाजारा’चा जिल्ह्याच्या राजकारणाशी उगाच संबंध जोडू नका.)