टांझानियातील किलीमांजरोवर शिवजयंती साजरी

0

सह्याद्रीतील मावळ्यांचा उपक्रम

पिंपरी : शिवजयंतीचा देशातील उत्साह आपण पहिला आहे. पण छत्रपती शिवरायांचा जयघोष परदेशात दूर आफ्रिकेमध्येही घुमवला पिंपरी-चिंचवडमधील सह्याद्रीच्या मावळ्यांनी. अनिल चंद्रकांत वाघ (वय 33 वर्षे), क्षितीज अनिल भावसार (वय 27 वर्षे), रवी मारुती जांभूळकर (वय 30 वर्षे) आणि कोल्हापूर येथील प्रवीण चव्हाण आणि त्यांचे सहकारी यांनी ही धाडसी मोहीम फत्ते केली. या शिवप्रेमी मावळ्यांनी टांझानियामधील सर्वात उंच माऊंट किलीमांजरो पर्वताच्या शिखरावर शिवजयंती साजरी करून तमाम शिवभक्तांच्या माना उंचावल्याआहेत. जयंतीनिमित्त त्याठिकाणी शिवाजीमहाराजांच्या मूर्तीवर अभिषेक केला.

या प्रवासाबद्दल बोलताना रवी जांभूळकर म्हणाले, शिखर चढणे व उतरणे अशी एकूण सहा दिवसांची ही मोहिम होती. दक्षिण आफ्रिका, टांझानिया येथील सर्वात उंच किलीमांजरो या पर्वतावर शंकू, कोंबो, मवेन्झी आणि शिरा हे निष्क्रिय ज्वालामुखी आहेत. हा पर्वत सर करण्याचे धाडस खूप कमी गिर्यारोहकांनी दाखवले आहे. दि. 16 फेब्रुवारीला आम्ही किलीमांजरो नॅशनल पार्क येथून मोहिमेस सुरुवात केली. 18 फेब्रुवारीला आम्ही खूब हटला पोहचलो व रात्री 12 वाजेपर्यंत आराम करून रात्री 1 वाजता पुन्हा पदभ्रमण चालू करून शेवटच्या टप्प्याकडे प्रस्थान केले. पहाटे 7 वाजता सर्वोच्च माथ्यावर पाऊल ठेवले. या शिखरावर गोठवणारी थंडी व अति वेगाने येणारे वारे अनुभवायला मिळाले

महाराजांना दिली मानवंदना
खुब हट ते तासनिया पॉईंट अतिशय कठीण चढाई होती. वार्‍याचा वेग प्रचंड होता. त्यामुळे ड्रोन उडवणे जोखमीचे होते. फोटो काढणेही शक्य होत नव्हते. आम्ही तर सह्याद्रीतील मावळे होतो मग हार थोडीच मानणार का. आम्ही ड्रोन उडविण्यासाठी खटपट करीत होतो. वार्‍याचा वेग 5 मिनिटांसाठी कमी झाला, त्याचा आम्ही सदुपयोग करून ड्रोन उडवला थोडे शूट घेता आले. कारण उणे 7 ते 8 तापमानात ड्रोन उडवणे अशक्य गोष्ट होती. त्यासाठी आम्ही खूब हठ या ठिकाणी खाली जाऊन शिवजयंती साजरी करायची हा धाडसी निर्याय घेतला. वार्‍याचा वेग प्रचंड असल्याने फ्लॅग बाहेर काढणे कठीण झाले. कसाबसा भगवा बाहेर काढला, शिखर माथ्यावर फिरवला व घोषणा देऊन महाराजांना मानवंदना दिली. खाली येऊन शिवजयंती साजरी केली

विदेशी पर्यटक झाले सामील
आमचा हा उत्साह पाहून परदेशी पर्यटकांनीही आम्हाला साथ दिली. ग्रीस, जपान, चीन, इराक, इराण, न्युझीलंड अशा विविध देशातील गिर्यारोहकांनी मूर्तीबद्दल आमच्याकडे विचारणा केली. आम्ही त्यांना इतिहास सांगितला. त्यांना खूप आनंद झाला. तुम्ही 350 वर्षानंतरही तुमच्या राजाची जयंती साजरी करता. ही अभिमानाची गोष्ट आहे, असे ते म्हणाले. त्यामुळे जगातील 14 देशातील पर्यटकांना शिवाजी महाराज काय आहेत ते समजले. तसेच भारतीय संस्कृतीत जगणारे आम्ही नुसते शिखर चढत नाहीत तर इतिहास पण जपतो, हे सिद्ध करून दाखविले.

जागतिक विक्रम केला
गिर्यारोहक अनिल वाघ म्हणाले की, ज्येष्ठ गिर्यारोहक सुशील दुधाणे आणि उद्योजक सूर्यकांत शेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहिम फत्ते करण्यात आली. सह्याद्रीच्या या मावळ्यांनी शिवजयंतीच्या दिवशी येथे छत्रपती शिवरायांच्या दोन फुटी पुतळ्याचा अभिषेक करुन छत्रपती शिवरायांना अभिवादन केले. हा एक जागतिक विक्रम म्हणावं लागेल. सूर्यकांत शेंडे, सुधीर कवडे, संजय क्षीरसागर व डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलगुरु पी. डी. पाटील यांना ही मोहीम समर्पित करण्यात आली. या मोहिमेसाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे विशेष सहकार्य लाभले. तसेच बेंगलोर माउंटिंग क्लब चे नीरज माळवे व कीर्ती ओसवाल यांचे मोलाचे मार्गदर्शन केले.