टाकळीच्या शेतकर्‍याची विष प्राशन करून आत्महत्या

बँक कर्जाला कंटाळून पाऊल उचलल्याची चर्चा

चाळीसगाव : तालुक्यातील टाकळी प्र.दे. येथील 40 वर्षीय शेतकर्‍याने बँक कर्जाला कंटाळून विष प्राशन करून आत्महत्या केली. दरम्यान, बँकेच्या कर्जाला कंटाळून शेतकर्‍याने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची चर्चा आहे. योगेश दिलीप पवार (40, टाकळी प्र.दे, ता.चाळीसगाव) असे मयताचे नाव आहे.

विष प्राशन करीत आत्महत्या
आंबा फाटा जवळील मन्याड डॅम येथे शेतकर्‍याने विष घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार शुक्रवार, 27 रोजी सकाळी 8.30 वाजेच्या सुमारास उघडकीस आला. गावातील भाऊसाहेब हिंमत पवार, कैलास बाबुराव देवरे, दिलीप उत्तम पवार यांना योगेश हे बेशुद्ध अवस्थेत मिळून आल्यानंतर खासगी वाहनाने ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकार्‍यांनी तपासून मयत घोषित केले. योगेश यांच्या पश्चात्य पत्नी, मुलगा, मुलगी असा परीवार आहे. घरातील कर्ता पुरुषच काळाच्या पडद्याआड गेल्याने गावात हळहळ व्यक्त करण्यात आली. ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. याबाबत मेहुणबारे पोलिस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.