टाकवे बुद्रुकमध्ये बिबट्याचा वावर

0

वन अधिकार्‍यांनी दिली माहिती

कामशेत : कामशेत, मावळ भागामध्ये दाट वनराई असल्यामुळे येथे बिबट्याचा वावर असल्याचे अनेकदा दिसून आले आहे. वेगवेगळ्या गावांमध्ये बिबट्याचे दर्शन होत असते. टाकवे खुर्द गावामध्ये बिबट्याचा वावर आढळल्याने नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाल्याचे वन विभागाच्या अधिकार्‍यांनी सांगितले आहे. मात्र शुक्रवारीच गावातील शाळेच्या मागच्या बाजुला असलेल्या मेंढपाळांच्या घोडीवर रात्री हल्ला करून बिबट्याने तिची शिकार केली. ही शिकार बिबट्यानेच केली असल्याचा अंदाज काढला जात आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

पाण्याच्या शोधात आल्याचा अंदाज

या परिसरात घनदाट जंगल असून सह्याद्रीच्या कुशीत वसलेले टाकवे गावाच्या आजू-बाजूने डोंगर आहेत. या भागात यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने जंगलामध्ये पाण्याचा वानवा आहे. या भागातून पाण्याच्या शोधात बिबटे गावात आल्याचा अंदाज स्थानिक गावकरी व्यक्त करीत आहेत. शेतकरी उशिरापर्यंत शेतात काम करत आहेत. त्यातच बिबटे आढळल्यामुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण झाले आहे. टाकवे खुर्द परिसरात अनुचित प्रकार घडण्याअगोदर सर्च ऑपरेशन’ करून व पिंजरा लावून बिबट्यांना पकडावे, अशी मागणी स्थानिक नागरीक करीत आहेत. गेल्या काही दिवसांपासून याठिकाणी वन विभागाच्या अधिकार्‍यांनी भेट दिली. परिसराची पाहणी करून वन विभागाकडून दोन टीमची नियुक्ती केली. परंतु पुढे या टीमच्या हातात काही लागले नाही.