टाकाऊपासून टिकावू वस्तूंचे प्रदर्शन

0

शहापूर : शहापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा खर्डी क्रमांक 1 या शाळेत या वर्षी नाविण्यपूर्ण उपक्रम म्हणून विद्यार्थ्यांनी टाकाऊपासून टिकाऊ वस्तू तयार केल्या. हा अभिनव उपक्रम राबवून तयार केलेल्या साहित्याचे प्रदर्शन व कला दालनाच्या उदघाटनाचा कार्यक्रम संपन्न झाला. या अभिनव उपक्रमाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक सुधीर भोईर व त्यांच्या सहकारी शिक्षकांचे अभिनंदन केले जात आहे.

याबाबत शाळेच्या मुख्याध्यापकांनी दिलेल्या माहितीनुसार जिल्हा परिषद शाळा खर्डी नंबर 1 ह्या शाळेतील विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली टाकाऊ वस्तूपासून सुशोभित टिकावू वस्तू तयार केल्या आहेत. ह्यामध्ये खराब झालेल्या सिडीपासून मासे, पाण्याच्या रिकाम्या बाटल्यापासून फुलदानी, कागदी टोपी, कागदी पिशव्या, मुलांनी काढलेली चित्रे, फिशटँक, पाय मोज्यांपासुन बाहुल्या, मातीच्या वस्तू, फळे, भांडी, वाँलपीस, पेपर डिशपासून मुखवटे, प्रसादाच्या द्रोण पासून फुलपाखरु, घरांचे विविध प्रकार, कागदी बुके इत्यादी साहित्य तयार केले.

ह्या विद्यार्थ्यानी तयार केलेल्या कला दालनाचे उदघाटन खर्डी गावाच्या सरपंच भाग्यश्री दिघे, उपसरपंच सचिन जाधव, गटशिक्षणाधिकारी आशिष झुंजारराव यांच्या हस्ते झाले. यावेळी या कार्यक्रमास केंद्रप्रमुख वाळुंज मॅडम, जिल्हा परिषद शाळा खर्डी नंबर 1 चे मुख्याध्यापक सुधीर भोईर, शिक्षिका भेरे, चांदेकर, सगळे, झडे, ग्रामपंचायत सदस्य आसिफ शेख, पत्रकार नरेंद्र जाधव हेही उपस्थित होते. यावेळी केंद्रातील शाळांसाठी तयार करण्यात आलेल्या शैक्षणिक साहित्याचे वाटप गटशिक्षणाधिकारी आशिष झुंजारराव यांच्या हस्ते करण्यात आहे.