टाकाऊ करवंटीपासून बनविलेल्या हस्तकलेने घातली सर्वांना भुरळ

0

शिंदखेडा (प्रा.अजय बोरद)। माणसाला कुठली कला कधी प्रसिद्धी देऊन जाईल याचा नेम नाही. आजकाल अशी कला जोपासणारी अनेक उदाहरणे आपण पाहत असतो. शिंदखेडा येथील शिक्षक सुनील मोरे यांनी देखील असाच नवा कलेचा प्रकार लोकांच्या समोर आणला आहे. काहीतरी वेगळे करण्याची जिद्द मनाशी बाळगुन नारळाच्या टाकाऊ करवंटीला शोभिवंत कलाकृतीमध्ये रूपांतरित केले आहे. आता पर्यंत त्यांनी तीनशेहून अधिक शोभीवंत वस्तू नारळाच्या करवंटीपासुन तयार केल्या आहेत. त्यांनी जोपासलेला हा छंद सर्व कलाप्रेमींसाठी आकर्षणाचा विषय ठरला आहे.

शेकडो कलाकृतींचे निर्माण : नारळाच्या करवंटीपासुन सुनील मोरे यांनी साडे तीनशेहुन अधिक कलाकृती साकारल्या आहेत. त्यात स्मृतीचिन्हे, चषके, वर्ल्डकप,टेबल लँम्प,नाईट लँम्प, आकाश कंदील, समई, लामण दिवा, कंदील , फुलाची परडी, विविध प्रकाराची फुले, फुलपाखरू ,मासे, कासव, माकड, घुबड, कबूतर, जहाज, विविध आकारांच्या फुलदाण्या,वारली भांडे, भिंतीवरील शो पीस, हँगीग शो पीस, कॅन्डल स्टँड, किचेन्स, पेन स्टँन्ड या कलाकृतींचा समावेश आहे. लेक वाचवा लेक शिकवा, स्त्री भृणहत्या,वृक्षतोड, वृक्षसंवर्धन, पाणी वाचवा या विषयांवरील कलाकृती अधिक आकर्षक आहेत.

अनेक ठिकाणी प्रदर्शनी : शिंदखेडा येथील कलाशिक्षक सुनील मोरे हे बी.एस्सी.डी.एड आहेत 1997 मध्ये कोकणातील रत्नागीरी येथे प्राथमिक शाळेत नोकरीला सुरवात केली. सन 2013 मध्ये शिंदखेडा तालुक्यातील नेवाडे येथील जि.प.शाळेत त्यांची बदली झाली असून सध्या याठिकाणी कार्यरत आहेत. सुनील मोरे यांनी तयार केलेल्या कलाकृतीचे प्रदर्शन धुळे, दोंडाईचा फेस्टीव्हल,एन डी मराठे हायस्कुल शिंदखेडा, रत्नागिरी येथील मंडणरा शिक्षण महोत्सव तसेच विविध शिक्षक प्रशिक्षण व गटसंम्मेलनात प्रदर्शन भरली आहेत. त्यांना विविध पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले.

अन नवनिर्मितीचा ध्यास
हिंदू संस्कृतीच्या अनेक धार्मिक व सार्वजनिक कार्यात श्रीफळ (नारळ) वाहन्याची श्रद्धा आहे. त्यामुळे नारळाचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. अनेक धार्मिक स्थळांमध्ये नारळाच्या करवंट्यांचा ढिग पाहवयास मिळतो. त्यामुळे पर्यावरणालादेखील हाणी पोहचते. सुनिल मोरे हे कोकणात नोकरीला असतांना सिंधूदुर्ग येथे पर्यटनासाठी गेले होते. त्याठिकाणी नारळाच्या करवंट्या बघून वाया जाणार्या या भागापासून नवनिर्मीती करता येवू शकते असा विचार त्यांच्या मनामध्ये आला आणि त्यामधुनच मोरे यांनी नारळाच्या करवंटीपासुन शोभिवंत वस्तुची कलाकृती साकारली आहे. गेल्या सात वर्षापासुन त्यांनी हा छंद जोपासला आहे.

नारळाच्या करवंटीपासुन कलाकृती निर्माण करण्याचा कुठलाही व्यावसायिक हेतू नाही फक्त एक छंद म्हणुन जोपासला आहे. कलाकृती साकारतांना नारळाच्या करवंटीला आकार देण्यासाइी हॅक्सॉब्लेड व पॉलीश पेपर या दोन साधनांचा वापर केला जातो. आकर्षक कलाकृती तयार झाल्यावर योग्य रंगसंगती वापरून त्या कलाकृतीमध्ये जीवंतपणा निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. मी कुठलीही कलाकृती विक्री करत नाही. शाळेत कार्यानुभावाच्या तासिकेत विद्यार्थ्यांना या कलाकृती निर्माण करण्याची माहिती देत असतो. विद्यार्थ्यांकडून मिळालेल्या प्रतिसादाबद्दल समाधान वाटते. मी निर्माण केलेल्याया कलाकृतीचे प्रदर्शन मुंबई येथील आर्ट गॅलरीत भरावे अशी माझी इच्छा आहे.
– सुनील मोरे