टाटांची ‘कॉर्पोरेट बॅटल’

0

डॉ. युवराज परदेशी

उद्योगजगतातील स्पर्धा, हेवेदावे, वाद-विवाद सातत्याने चर्चेत असतात. त्यात उद्योग समूह किंवा त्यातील व्यक्ती जितकी मोठी तितकी जास्त चर्चा असते. सध्या भारतातील सर्वाधिक जुन्या दिग्गज व्यावसायीक घराण्यांपैकी एक असलेल्या टाटा समूहातील वाद केवळ देशातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवर चर्चेचा विषय ठरला आहे. ऑक्टोबर 2016मध्ये टाटा सन्सच्या चेअरमनपदावरुन सायरस मिस्त्री यांची हकालपट्टी केल्यानंतर मिस्त्र यांच्यावतीने राष्ट्रीय कंपनी विधी अपिलीय न्यायाधीकरण (एनसीएलएटी)मध्ये दावा दाखल करण्यात आला होता. या न्यायालयीन लढाईत सायरस मिस्त्री यांची सरशी झाली असून त्यांना पुन्हा टाटा सन्सच्या चेअरमनपदी नेमण्याचे आदेश दिले. त्यांना 2016मध्ये एकाएकी पदावरून हटवणे अयोग्य असल्याचेही मत एनसीएलएटीने व्यक्त केले आहे. या प्रकारामुळे टाटा समूहाला मोठा धक्का बसला आहे.

टाटा.. भारतीयांसाठी ही केवळ दोन अक्षरे नाहीत तर विश्वासाच्या भक्कम पायावर उभी असलेली दीडशे वर्षांची परंपरा आहे. गुजरातमधील एका लहानशा गावात पारशी कुटुंबात जन्मलेल्या जमशेदजी टाटा यांनी सुरुवातीला एकवीस हजार रुपये भांडवल गुंतवून पायभरणी केलेल्या या उद्योग समूहाच्या 100 पेक्षा जास्त कंपन्या आजमितीस जगाच्या सहा खंडांतील ऐंशी देशांत कार्यरत आहेत. त्यातल्या काही मोठ्या कंपन्या म्हणजे टाटा स्टील, टाटा मोटर्स, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, टाटा पॉवर, टाटा केमिकल्स, टाटा ग्लोबल बिव्हरेजेस, टाटा टेलिसर्व्हिसेस, टायटन इंडस्ट्रीज, टाटा कम्युनिकेशन्स आणि ताज हॉटेल्स यांचा प्रामुख्याने ÷उल्लेख करावा लागेल. टाटाचे दुसरे नाव म्हणजे विश्वास! फक्त बक्कळ नफा कमविण्यासाठी टाटा समूह काम करत नाही. टाटांनी उद्योग उभारणी करताना देशउभारण्याचे स्वप्न पाहिले आणि ते निर्धाराने कायम ठेवले. अनेकदा तोटा सहन करावा लागला. अनेकदा उद्योग तोट्यात चालवून डोक्यावर कर्जाचे डोंगर उभा राहिले. या सगळ्या यशापशाच्या प्रक्रियेतून जात असताना कधीही कुठेही टाटांनी स्वतःबद्द्ल अविश्वास निर्माण होऊ दिला नाही. उद्योगाच्या नफ्याआधी त्याची प्रतिष्ठा महत्त्वाची मानली. टाटा उद्योग समूहाने आतापर्यंन सामाजिक बांधीलकी जपली आहे.(कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलीट कायदा अस्तित्त्वात नसतांनाही) टाटा ट्रस्टच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबवले जातात. त्यातून लोकांमध्ये टाटा समूहाबद्दल आपलेपणा निर्माण झाला आहे. टाटा समूहाची जबाबदारी रतन टाटा यांच्यापर्यंत होती तोपर्यंत सर्वकाही सुरळीत सुरु होते मात्र टाटा सन्सची 18.4 टक्के हिस्सेदारी असलेल्या शापूरजी पालोनजी अँड कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक सायरस मिस्त्री यांची जेंव्हापासून रतन टाटा यांचे वारसदार म्हणून निवड झाली तेंव्हापासून टाटा समूहामध्ये कॉर्पोरेट बॅटल पहायला मिळाली. निव्वळ नफा कमवायचा, हे धोरण स्विकारत सारयर मिस्त्री यांनी तोट्यातील कंपन्या बंद करण्यास सुरुवात केल्यानंतर हा वाद जास्तच उफाळला. निव्वळ नफाच कमवायचा तर टाटा समूह आणि इतर उद्योगांमध्ये फरक काय? हा फरक आत्तापर्यंत स्पष्ट होता, अशी धारण रतन टाटांची असल्याने त्यांनी सायरस मिस्त्री यांची ऑक्टोबर 2016मध्ये टाटा सन्सच्या चेअरमनपदावरून हकालपट्टी केली. त्यानंतर दोन महिन्यांनी मिस्त्री यांच्यावतीने त्याच्या परिवारातील ‘सायरस इन्व्हेस्टमेंट प्रायव्हेट लिमिटेड’ आणि ‘स्टर्लिंग इन्व्हेस्टमेंट कॉर्प’ने टाटा सन्सच्या निर्णयाविरुद्ध एनसीएलटीच्या मुंबई खंडपीठात दावा दाखल केला. या कंपन्यांच्या मते टाटा सन्सच्या चेअरमनपदावरून मिस्त्री यांची करण्यात आलेली हकालपट्टी कंपनी कायद्याला धरून नव्हती. त्यांनी टाटा सन्सच्या व्यवस्थापनावर आणि रतन टाटा यांच्यावरही आरोप केले. मात्र, जुलै 2018मध्ये एनसीएलटीने त्यांचा दावा रद्दबातल ठरवला. त्यानंतर मिस्त्री यांनी एनसीएलएटीमध्ये दावा दाखल केला. मिस्त्री यांच्या हकालपट्टीसाठी अनेक कारण होती. यात प्रामुख्याने ÷उल्लेख करावयाचा म्हटल्यास, 2025 पर्यंत टाटा समूह बाजारभांडवलाच्या दृष्टीने जगभरातील टॉप 25 समूहांमध्ये विराजमान व्हावा, अशी मिस्त्री यांची योजना होती. तसेच, जगभरातील 25 टक्के लोकसंख्येपर्यंत पोहोचण्याचे संकेतही त्यांनी दिले होते. मात्र, यादृष्टीने कोणतेही नियोजन करण्यात त्यांना अपयश आले. टाटा समूहाच्या विविध उद्योगांचा विस्तार करण्यात मिस्त्रींना अपयश आल्याचाही ठपका त्यांच्यावर आहे. टाटा समूहाच्या अनेक कंपन्यांमध्ये क्रॉस ओनरशिप आहे. टाटा सन्सची टाटा मोटर्स आणि टाटा स्टीलमध्ये हिस्सेदारी आहे. तसेच या कंपन्यांची अन्य कंपन्यांमध्ये हिस्सेदारी आहे. त्यामुळे कंपनीची डायव्हर्सिफाइड म्हणून ओळख निर्माण होत नव्हती. त्यातच मिस्त्री यांच्या कार्यकालात टाटा समूहाच्या कार्यप्रणालीमध्ये नोकरशाहीचा दबदबा वाढला. सर्वात महत्त्वाचे म्हणजे; समभागधारकांशी वाईट व्यवहार! यासंबंधी टाटा मोटर्सच्या समभागधारकांनी ऑगस्ट 2016मध्ये तक्रार नोंदवली. त्या तक्रारीमध्ये प्रति समभाग 20 पैसे लाभांश दिल्याचे त्यात नमूद करण्यात आले होते. टाटा समूहात नेतृत्व संघर्ष नवा नाही. रतन टाटांच्या हातात समूहाच्या अध्यक्षपदाची सूत्रं आल्यानंतर जुन्या मातब्बरांनी त्यांच्या निर्णयप्रक्रियेत अडथळे आणलेले होते. टाटांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला गेला. पण, टाटांनी या मातब्बरांनाच घरी पाठवले. हा सगळा संघर्ष बोर्डरूममध्येच सुरू होता. रतन टाटांनी वर्चस्व स्थापन केल्यावर मात्र संघर्ष संपला. या शिवाय अंबानी समूहात मुकेश अंबानी व अनिल अंबानी यांच्यातील वाद सर्वश्रूत आहे. भारतातील सर्वाधिक जुन्या दिग्गज व्यावसायीक घराण्यांपैकी एक असलेल्या गोदरेज उद्योग समुहातही संपत्तीवरुन वाद सुरु होते. आदि गोदरेज, नादिर गोदरेज आणि त्यांचे चुलत भाऊ जमशेद गोदरेज या तीन भावंडांमध्ये वैचारिक मतभेद निर्माण झाल्याने त्यांच्या संपत्तीची वाटणीपर्यंत विषय चिघळला होता. अन्य मोठ्या उद्योग समूहातही अनेकवेळा असे वाद उफाळले आहे मात्र येथे दीडशेहून अधिक वर्षांची परंपरा असलेल्या किंबहुना देशाच्या औद्योगिकीकरणाचा पाया घालणार्‍या या समूहात नेतृत्वावरून संघर्ष पेटलेला पाहणे हे असंख्य समभागधारकांसाठी वेदनादायीच आहे. या समभागधारकांसाठी प्रश्न निव्वळ पैशांचा नाही, या समूहात त्यांची भावनिक गुंतवणूक आहे. या संघर्षामुळे त्यांच्या भावनांनादेखील तडा गेला आहे. त्यामुळे टाटा समूहातील कलह हा अनेक अर्थाने त्रासदायक आहे. या निर्णयाचा परिणाम गुंतवणूकदारांच्या मनोबलावर पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.