टाटा ओपन महाराष्ट्र एटीपीमुळे नवोदितांना प्रेरणा – मुख्यमंत्री फडणवीस

0

टेनिस स्पर्धेचे उद्घाटन

पुणे : टाटा ओपन महाराष्ट्र एटीपी टेनिस स्पर्धा सदैव पुण्यातच होईल. या स्पर्धेमुळे नवोदितांना प्रेरणा मिळेल. अ‍ॅकॅडमीच्या माध्यमातून भविष्यात विजेते निर्माण होतील, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. म्हाळुंगे-बालेवाडीतील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात सोमवारी सायंकाळी स्पर्धेचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले. त्यावेळी इतक्या महत्त्वाची स्पर्धा पुण्यात होणे राज्याचा आणि देशाचा लौकिक उंचावणारे असल्याचे नमूद करून ते म्हणाले की, 15 देशांच्या खेळाडूंचा सहभाग, त्यात चॅम्पियन असणे भूषण आहे. ही स्पर्धा प्रेक्षकांसाठी पर्वणी ठरेल.

यावेळी पालकमंत्री गिरीश बापट, महापौर मुक्ता टिळक, पिंपरी-चिंचवडचे महापौर राहुल जाधव, अभिजित पवार, आमदार लक्ष्मण जगताप, संजय ऊर्फ बाळा भेगडे, भीमराव तापकीर, अन्न व औषध प्रशासन आयुक्त पल्लवी दराडे, पुणे महापालिकेचे आयुक्त सौरभ राव, पिंपरी-चिंचवडचे आयुक्त श्रावण हार्डीकर, प्रशांत सुतार, एमएमआरडीएचे सहआयुक्त संजय खंदारे, सुंदर अय्यर उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांचे स्वीय सचिव प्रवीण दराडे यांनी प्रास्ताविक केले. ते म्हणाले, या स्पर्धेच्या निमित्ताने राज्यात टेनिसचा प्रसार आणि प्रचार करण्याचे व्यापक प्रयत्न सुरू आहेत.

..मुख्यमंत्र्यांनी कॅचही घेतला

कार्यक्रमानंतर मुख्यमंत्र्यांनी हातात रॅकेट घेऊन कोर्टच्या तीन बाजूंना सफाईदार अन् उत्तुंग शॉट मारले. चौथ्या बाजूला त्यांनी मारलेला चेंडू स्टेडियमच्या छपराला लागून कोर्टवर पडला. स्वयंसेवकाने तो चेंडू मिळविला. तो पुन्हा आपल्याकडे टाकावा असे खुणावत मुख्यमंत्र्यांनी हात वर केला आणि एका हातात तो अचूकपणे टिपला तेव्हा सर्वांनीच दाद दिली.