टाटा फायनान्सचे माजी एमडी पेंडसेंची आत्महत्या

0

मुंबई : टाटा फायनान्सचे माजी व्यवस्थापकीय संचालक दिलीप पेंडसे यांनी बुधवारी दादर येथील कार्यालयात आत्महत्या केली. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. पेंडसे पत्नीसोबत दादर पूर्वेकडील रॉयल ग्रेस इमारतीच्या पहिल्या मजल्यावर राहतात. त्याच इमारतीच्या तळमजल्यावर त्यांचे कार्यालय आहे. सकाळी 9 वाजता ते कार्यालयात आले. त्यानंतर बराच वेळ झाला ते बाहेर आले नाही म्हणून दुपारी अडीच वाजता स्थानिकांनी पोलिसांना कळविले. माटुंगा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तेव्हा पेंडसेंनी गळफास घेत आत्महत्या केल्याचे दिसून आले. त्यांच्या जवळून पोलिसांनी सुसाईड सापडली आहे. त्यामध्ये वैयक्तिक कारणातून त्यांनी हे पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती समोर येत असल्याचे माटुंगा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक बी. एम. काकड यांनी दिली.

टाटा समूहाने केली होती कारवाई
दिलीप पेंडसे टाटा फायनान्सचे व्यवस्थापकीय संचालक असताना टाटा फायनान्स तोट्यात गेल्याने टाटा समूहाने 2001 मध्ये त्यांच्यावर कारवाई केली होती. पेंडसेंविरोधात तक्रारही दाखल करण्यात आली होती. त्यामुळे पेंडसे यांना तुरूंगाची हवाही खावी लागली होती. पेंडसेंविरुद्ध सर्वप्रथम ऑक्टोबर 2002 मध्ये टाटा फायनान्सतर्फे तक्रार आली होती. हिमाचल फ्युच्युरिस्टिक कम्युनिकेशन्स, टाटा इंजिनिअरिंग अ‍ॅण्ड लोकोमोटिव्ह कंपनी (टेल्को म्हणजेच सध्याची टाटा मोटर्स), इन्फोसिस व सॉफ्टवेअर सोल्युशन्स इंडिया या चार कंपन्याच्या समभाग व्यवहारांमध्ये पेंडसे यांच्याबरोबर दोन दलाल झुनझुनवाला स्टॉकब्रोकर्स व प्रतिक स्टॉक व्हिजन याही सहभागी होत्या. या प्रकरणाचा तपास करण्यात आल्यानंतर सेबीने पेंडसेना एप्रिल 2009 मध्ये नोटिस पाठविली व डिसेंबर 2012 मध्ये आदेश जारी केला. त्याला पेंडसेंनी लवादात आव्हान दिले. लवादाच्या निदेर्शानंतर सेबीने पेंडसे यांना आपली भूमिका मांडण्याची संधी दिली. त्यानंतर तक्रारीत तथ्य आढळल्याचे कारण देत दोषी ठरविले होते.