टाटा मोटर्सच्या विद्यानिकेतन शाळेत बियांचे पिशवीत रोपण

0

पिंपरी-चिंचवड : पर्यावरण संवर्धनासाठी सतत नानाविध उपक्रम राबविणारी संस्था म्हणून, पर्यावरण संवर्धन समितीचा नावलौकिक आहे. पर्यावरणाच्या संवर्धनासाठी प्रबोधनपर उपक्रम राबविताना समिती नेहमी शालेय विद्यार्थ्यांना त्या उपक्रमात सहभागी करून घेत असते. विद्यार्थ्यांच्या मनावर पर्यावरण संवर्धनाचे संस्कार रुजविण्याचे काम या माध्यमातून होत आहे. अशाच प्रकारचा उपक्रम समितीने नुकताच टाटा मोटर्सच्या विद्यानिकेतन शाळेत राबविला. विद्यानिकेतन शाळेत समितीच्या पुढाकाराने 1200 बियांचे पिशवीत रोपण करण्यात आले. या उपक्रमात शाळेतील सुमारे दोन हजार विद्यार्थ्यांनी मोठ्या हिरीरीने सहभाग नोंदविला.

रिकाम्या पिशव्यांचा वापर
विद्यानिकेतन शाळेतील दोन हजार विद्यार्थ्यांना सोबत घेऊन बियांचे पिशवीत रोपण करण्यात आले. त्यातील 1200 विद्यार्थ्यांनी घरातील एक लिटर दुधाच्या आणि तेलाच्या रिकाम्या पिशवीत चांगल्या प्रतीची माती भरून शाळेत आणली. त्या पिशव्यांमध्ये पर्यावरण संवर्धन समितीच्या स्वयंसेवकांच्या मदतीने अर्जुन झाडाच्या 1200 बियांचे रोपण करण्यात आले. रिकाम्या व निरुपयोगी पिशव्यांचा विधायक कामासाठी वापर करण्यात आला. त्यातून कचर्‍याची समस्यादेखील निकाली निघाली. ‘टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ काम’ विद्यार्थ्यांनी केले.

यांची होती उपस्थिती
या उपक्रमप्रसंगी व्ही. रामकृष्णन, लीना कौन्तिन्हो, पर्यावरण संवर्धन समितीचे अध्यक्ष विकास पाटील, विनिता दाते, पुरुषोत्तम पिंपळे, प्रभाकर मेरूकर, गोविंद चितोडकर, दत्तात्रेय कुमठेकर, सुभाष चव्हाण, गोरक्षनाथ सानप, अनिल दिवाकर, मीनाक्षी मेरूकर, अनघा दिवाकर, सुनीता जुन्नरकर आदी उपस्थित होते.

रोपांचेही विद्यार्थीच करतील रोपण
पर्यावरण संवर्धन समितीने टाटा मोटर्सच्या विद्यानिकेतन शाळेत मागील वर्षी विद्यार्थी पर्यावरण समितीची स्थापना केली आहे. शहरातील अन्य शाळांमध्येदेखील अशाच पद्धतीचे उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे विकास पाटील यांनी यावेळी सांगितले. आपण लावलेल्या बियांचे रोप कसे तयार होते, लहान रोप मोठे कसे होते, याचे निरीक्षण करता यावे, म्हणून बिया लावण्यात आलेल्या पिशव्या शाळेच्या आवारातच ठेवण्यात येणार आहेत. रोपांची योग्य वाढ झाल्यानंतर विद्यार्थ्यांच्याच हातून त्यांचे रोपण करण्यात येणार आहे.