पिंपरी-चिंचवड : गेल्या 19 महिन्यांपासून सुरू असलेला टाटा मोटर्स कंपनीतील कामगार-कर्मचारी व व्यवस्थापन यांच्यातील संघर्ष पूर्णपणे मिटण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. गुढीपाडव्याच्या दिवशी (28 मार्च) व्यवस्थापन व कामगारांना मान्य असलेल्या करारावर सह्या होणार आहेत. सुटीचा दिवस असतानाही रविवारी (26 मार्च) कंपनी व्यवस्थापन व कामगार प्रतिनिधी यांच्यात झालेल्या संयुक्त बैठकीत यावर शिक्कामोर्तब झाल्याची खात्रीशीर माहिती आहे. टाटा उद्योगसमूहाचे प्रमुख रतन टाटा व अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांच्या दौर्यादरम्यान झालेल्या चर्चेनंतर वेगवान घडामोडी झाल्या. त्याची फलनिष्पत्ती म्हणूनच हा करार होत असल्याचे सांगण्यात येत आहे.
वाटाघाटी फिस्कटल्याने आंदोलन
वेतनवाढ करार तसेच अन्य मागण्यांवरून टाटा मोटर्स कंपनीत 19 महिन्यांपासून संघर्ष सुरू आहे. यापूर्वी, विविध मार्गांनी कामगारांनी आपले म्हणणे मांडले. मात्र, व्यवस्थापनाकडून दाद मिळत नव्हती. म्हणून कामगारांनी आंदोलन सुरू केले होते. नव्याने सुरू झालेल्या चर्चेदरम्यान पुन्हा वाटाघाटी फिस्कटल्याने 16 मार्चपासून कामगारांनी कंपनीत आंदोलन सुरू केले. तणावपूर्ण वातावरणातच सोमवारी (20 मार्च) रतन टाटा व एन. चंद्रशेखरन पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार कंपनीत आले होते. मात्र, कामगारांच्या आंदोलनाची माहिती झाल्यानंतर इतर कार्यक्रम बाजूला ठेवून त्यांनी सर्वप्रथम कामगार प्रतिनिधींसमवेत चर्चा केली.
सकारात्मक चर्चेनंतर गाडी रुळावर
रतन टाटा व एन. चंद्रशेखरन यांच्यासोबत कामगार प्रतिनिधींनी प्रलंबित करारासंदर्भात सविस्तर चर्चा केली. त्यांच्यात झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर 15 दिवसात निर्णय घेऊ, अशी ग्वाही रतन टाटा यांनी दिली होती. त्यानंतर, कंपनी स्तरावर वेगवान हालचाली झाल्या. पाच दिवसात त्याचे दृश्य परिणाम दिसून आले. टाटांच्या दौर्यात त्यांच्यासमवेत असलेले कार्यकारी संचालक सतीश बोरवणकर यांनी रविवारी बैठक बोलावली. या वेळी व्यवस्थापनातील वरिष्ठ अधिकारी व प्रमुख कामगार प्रतिनिधी यांच्यात जवळपास अडीच तास चर्चा झाली. त्यानंतर, दोघांनी सकारात्मक भूमिका घेतल्याने सर्व मुद्द्यांवर एकमत झाल्याचे सांगण्यात आले.
गुढीपाडव्याचा मुहूर्त निवडला
मंगळवारी गुढीपाडवा असल्याने याच शुभ मुहूर्ताच्या दिवशी करारावर सह्या घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. रविवारी झालेल्या बैठकीत चालू पगारातील वाढ, निश्चित पगाराचे टप्पे, ब्लॉक क्लोजर आदी ठोस निर्णय घेण्यात आले आहेत. नवीन करारात; 1 सप्टेंबर 2015 पासून तीन वर्षांचा वेतनकरार राहणार आहे, कामगारांना सरासरी 17 हजार 300 रूपये वाढ मिळणे अपेक्षित आहे. त्यादृष्टीने तीन टप्पे निर्धारित करण्यात आले आहेत, कंपनीच्या वतीने यापूर्वी वर्षांला 12 ब्लॉक क्लोजर घेण्यात येत होते. त्यामध्ये आणखी सहाची वाढ करण्यात आली असून यापुढे वर्षांकाठी 18 ब्लॉक क्लोजर होतील, असे मुद्दे समाविष्ट करण्यात आले आहेत.
उद्योगनगरीचा कणा ‘टाटा मोटर्स’
उद्योगनगरी असलेल्या पिंपरी-चिंचवड शहराचा कणा समजल्या जाणार्या टाटा मोटर्स कंपनीत दोन वर्षांपासून वेतनवाढीचा करार प्रलंबित होता. सातत्याने प्रयत्न करूनही हा प्रश्न सुटत नव्हता. काही मुद्द्यांवर सकारात्मक चर्चा होत होती. मात्र, निश्चित पगार, त्यासाठीचे टप्पे आणि ब्लॉक क्लोजरचे सूत्र आदी मुद्द्यांवर एकमत होत नव्हते. कंपनी व्यवस्थापन आडमुठेपणाने वागत असल्याचे व कामगारांच्या प्रश्नांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा कामगार नेत्यांकडून होता. तर, आम्ही तोडगा काढण्यासाठी प्रयत्नशील असून कामगारांनी दोन पावले मागे आले पाहिजे, असे कंपनी व्यवस्थापनाचे म्हणणे होते. शेवटी रतन टाटा व एन. चंद्रशेखरन यांच्या दौर्यानंतर कामगार प्रतिनिधी व कंपनी व्यवस्थापनात झालेल्या यशस्वी वाटाघाटीत याप्रश्नी तोडगा निघाला.