टायगरने कधीच स्वत:ची बॅट वापरली नाही : फारुख इंजिनिअर

0

बेंगळुरू । पुर्वी आम्हाला कसोटीसाठी पाच दिवसाचे 250 रूपये मानधन मिळत असे,दर दिवसाचे 50 मिळत होते. मात्र पाच दिवसांची कसोटी झाली तरच 250 पक्के . तेव्हा देशाची प्रतिष्ठा,प्रेम यासाठी क्रिकेट खेळत असू . श्रीलंकेविरुद्धच्या कसोटीत मी आणि सुनील गावस्कर खेळत होतो आणि सामना चार दिवसांतच संपण्याची चिन्हे होती. आम्हाला सूचना केल्या जात होत्या की, वेडे झालात की काय, पाचव्या दिवसापर्यंत खेळ चालला पाहिजे. नाहीतर उद्याच्या 50 रुपयांना मुकावे लागेल. विराट तू ऐकतोयस ना ? टायगर म्हणजे पतौडी हा एक उत्तम फलंदाज होता. मात्र त्याने कधीच खेळण्यासाठी स्वत:ची बॅट वापरली नाही. मन्सूर अली खान पतौडी यांच्या स्मरणार्थ आयोजित पाचव्या व्याख्यानात फारुख इंजीनियर यांनी सांगितले.

सर्वोत्तम टायगर
इंजीनियर म्हणाले की, ‘टायगर हा दर्जेदार फलंदाज होता. एक डोळा गमावलेला असतानाही जगातील सर्वोत्तम फलंदाजात त्याचा समावेश होत असे. त्याच्याच विनंतीवरून आम्ही एकदा एका डोळ्याला पट्टी बांधून झेल पकडण्याचा सराव केला आणि त्यात काय झाले असेल हे सांगायला नको ! त्यामुळे टायगर हा महान होता असेच म्हटले पाहिजे. तो नैसर्गिक गुणवत्ता असलेला खेळाडू होता. त्याने कधी स्वतःची बॅट वापरली असेल की नाही शंकाच आहे. ड्रेसिंग रूममधील सर्व बॅटचे वजन तो तपासून पाहात असे आणि त्यातील एक बॅट घेऊन तो फलंदाजीला निघत असे. ती बॅट बहुतेक माझीच असे. माझ्यापेक्षा बॅटचा इतका उत्तम वापर कुणीतरी करत असल्याचे मला कौतुक होते.’

पुरस्कार विजेते
सी. के. नायुडू जीवन गौरवः राजिंदर गोयल व पद्माकर शिवलकर.
जीवनगौरव (महिला)- शांता रंगास्वामी.
विशेष पुरस्कारः व्ही. व्ही. कुमार, दिवंगत रमाकांत देसाई.
पॉली उम्रीगर पुरस्कारः विराट कोहली.
आर. अश्विन,जलज सक्सेना, अक्षर पटेल,श्रेयस अय्यर,शाहबाझ नदीम, जय बिस्ता, सत्यजीत बच्चाव, अरमान जाफर, निनाद राथव, अभिषेक शर्मा, मिताली राज,दीप्ती शर्मा,नितीन मेनन.