टिकटॉकचा गैरवापर केल्यास कठोर कारवाई – आयुक्त पद्मनाभन

0
वेगवेगळे आवाज, फिल्मी संवादात व्हिडीओ बनवण्यासाठी या अ‍ॅपची सध्या मोठी क्रेज 
पिंपरी : केवळ मनोरंजनासाठी तयार करण्यात आलेल्या अ‍ॅप्लिकेशनचा दुरुपयोग करत त्यातून अश्‍लील, बदनामीकारक आणि चुकीचे व्हिडिओ बनविण्यात येत आहेत. यामुळे भांडण, आत्महत्या, सार्वजनिक ठिकाणी गोंधळ, वाहतुकीस अडथळा असे अनेक प्रकार घडत आहेत. मात्र याची पिंपरी-चिंचवड पोलिसांनी गंभीरपणे दखल घेतली असून असा उपद्व्याप करणार्‍यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याची भूमिका पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांनी व्यक्त केली. वेगवेगळ्या आवाज आणि फिल्मी संवादात व्हिडीओ बनवण्यासाठी वापरण्यात येणार्‍या टिक टॉक अ‍ॅपची सध्या तरुणाईमध्ये मोठी क्रेज आहे. मात्र यामुळे जर एखाद्याची बदनामी, वाहतुकीस अडथळा तसेच सुव्यवस्थेला मारक कोणत्याही स्वरूपाची घटना घडल्यास त्यावर थेट कारवाई करण्यात येणार आहे. तसेच प्रसंगी संबंधित व्यक्तीला अटकही होणार आहे. यापुढे टिकटॉक चा गैरवापर करणार्‍यांवर पोलिसांचा विशेष वॉच असणार आहे. टिक टॉक व्हिडिओसाठी वाहतुकीला अडथळा निर्माण करणार्‍या टोळक्याला पोलिसांनी नुकतेच ताब्यात घेऊन तंबी देऊन सोडले आहे.
या अ‍ॅपचे साईड इफेक्टस
फेसबुक, व्हाट्सअ‍ॅप व इतर सोशल मीडियावरून टिक टॉक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात शेअर होत आहे. मात्र निव्वळ करमणुकीसाठी तयार करण्यात आलेल्या या अ‍ॅपचे अनेक साईड इफेक्ट्स दिसू लागले आहेत. पिंपरी-चिंचवड शहरातील एका शाळेत विद्यार्थ्यांनी मुलीचा व्हिडिओ काढत कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांचा संवाद जोडला होता. यामुळे बदनामी झाल्याप्रकरणी मुलीने पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. तर चिखली परिसरात पत्नीने पतीला कर्करोग असल्याचा टिक टॉक व्हिडीओ तयार करून तो व्हिडिओ पतीच्या मित्रांमध्ये शेअर करून पतीची बदनामी केल्याने पतीने आत्महत्या केली होती. तसेच अनेक मुलींच्या नकळत त्यांचे व्हिडीओ जोडून अश्‍लील संवाद असणार्‍या क्लिप तयार केल्या जात आहेत.
काळजी घेतली पाहिजे
या टिक-टॉक व्हिडिओबद्दल पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन म्हणाले की, वेगवेगळे मनोरंजन किंवा माहितीपर व्हिडीओ करणे, त्यासाठी अ‍ॅपचा वापर करणे यात काही गैर नाही. मात्र त्यामुळे कोणत्याही सामाजिक घटकांना त्रास होऊ नये याची काळजी घ्यावी. जर अ‍ॅपचा वापर चुकीच्या पद्दतीने होत असेल तर माहिती तंत्रज्ञान कायद्यासोबतच परिस्थितीनुरूप कलमे वाढवली जाणार आहेत. व्हिडिओमुळे वाहतुकीस अडथळा किंवा गंभीर पडसादच्या घटना घडत असतील तर संबंधिताला अटकही करण्यात येईल.