कल्याण । महागणपतीचे स्थान म्हणून प्रसिद्ध असलेल्या टिटवाळा शहराच्या पश्चिमेत नागरी वस्ती असलेल्या परिसरात मोठ्या संख्येने वीटभट्ट्या चालवल्या जात आहेत. त्यांचा धूरदेखील प्रचंड होत असल्याने धुराच्या प्रदूषणाने परिसरातील रहिवासी त्रस्त झाले आहेत. या समस्येबाबत पत्रकारांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी आणि तहसीलदारांना विचारणा केली असता एकमेकांकडे बोट दाखवण्यात धन्यता मानत आहेत. टिटवाळा येथील मांडा पश्चिमेतील सांगोडा रोडवर असलेल्या स्मशानभूमीजवळील नागरी वस्तीमध्ये वीटभट्ट्यांचा व्यवसाय चालत आहे. त्याचा मोठ्या प्रमाणावर धूर होऊन हवेचे प्रदूषण होत आहे. या प्रदूषित हवेमुळे रहिवाशांना, विशेषत: लहान मुलांना व श्वसनाचे विकार असलेल्या रुग्णांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. स्थानिक नागरिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या वीटभट्ट्या राष्ट्रवादीच्या एका माजी नगरसेवकाच्या असून, त्याचे स्थानिक भागात वजन असल्याने त्याविरुद्ध उघडपणे तक्रार करायला रहिवासी घाबरत आहेत. परिणामी, येथील रहिवाशांकडे तोड दाबून बुक्क्यांचा मार सहन करण्याशिवाय गत्यंतर राहिलेले नाही. शहरातील लोकप्रतिनिधींचे वीटभट्ट्यांच्या मालकासोबत लागेबांधे असल्याने तेही या विषयावर आवाज उठवण्यास तयार नसल्याचे समजते. प्राप्त माहितीनुसार, वीटभट्ट्या या नागरी वस्तीपासून निश्चित अंतर दूर असाव्यात, असा नियम आहे. मात्र, हा नियम येथे धाब्यावर बसवण्यात आल्याचा आरोप येथील रहिवासी करत आहेत.
यासंदर्भात वीटभट्ट्यापासून नागरिकांना होणार्या प्रदूषणाच्या त्रासाबाबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण नियंत्रण मंडळाचे अधिकारी डी. बी. पाटील यांना संपर्क साधला असता त्यांनी महसूल विभागाकडे बोट दाखवत या बाबीवर देखरेख अर्थात मॉनेटरिंग करण्याची जबाबदारी महसूल विभागाकडे असल्याची माहिती दिली तसेच त्यांनी आपल्याच विभागाचे अधिकारी अमर दुरगुले यांच्याशी बोलण्यास सांगत त्यांचा मोबाइल नंबर दिला.
कारवाई करण्यासाठी तक्रार हवी
दुरगुले यांच्याशी मोबाइलवर संपर्क साधला असता त्यांनी या वीटभट्ट्यांना आम्ही परवानगी दिली नसल्याचे सांगत सदर वीटभट्ट्याचा त्रासाबाबत तक्रार नसल्याने आम्ही त्यांच्यावर कारवाई करू शकत नसल्याचे स्पष्ट केले.
आम्ही फक्त रॉयल्टी घेतो
यासंदर्भात कल्याण तालुक्याचे तहसीलदार अमित सानप यांना मोबाइलवर संपर्क साधून विचारणा केली असता, ते म्हणाले की, महसूल विभाग हा फक्त रॉयल्टी घेण्याचे काम करतो. कारवाई महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ करते.