टिटवाळ्यात सराईत चोरटे गजाआड

0

कल्याण । टिटवाळा पोलिसांनी घरफोडी चोरीच्या गुन्ह्यातील अट्टल गुन्हेगार शिवाजी गोपाळ संते व त्याचा साथीदार चंडिचरण मंडल याला अटक करत त्याच्याकडून अडीच लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. कल्याणनजीक टिटवाळा परिसरात घरफोडी तसेच चोरीच्या वाढत्या घटनांच्या पार्श्‍वभूमीवर पोलीस अधीक्षक ठाणे ग्रामीण डॉ. महेश पाटील यांनी कल्याण तालुका पोलीस ठाणे टिटवाळा येथील प्रभारी अधिकारी प्रदीप कसबे यांनी या चोरट्यांना गजाआड करण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त केली होती. या चोरट्यांचा कसून शोध सुरु करत त्यानुसार गुन्ह्यांचा तपास करण्याच्या सूचना पोलीस अधिकार्‍यांना दिल्या होत्या.

अडीच लाखांचा मुद्देमाल हस्तगत
मानिवली पाडा येथे राहणारा शिवाजी गोपाळ संते याने कल्याण तालुका पोलीस ठाणे हद्दीत घरफोड्या, चोर्‍या केल्याचे बातमीदारामार्फत समजले. त्यानुसार संते यास ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली असता, त्याने सोपान चंडिचरण मंडल या साथीदाराच्या मदतीने टिटवाळा- परिसरात 5 ठिकाणी घरफोडी चोरी केल्याचे कबुली दिली. चोरट्यांकडून 2 लाख 51 हजार रूपये किंमतीचे एकूण 117 ग्रॅम सोन्याचे दागिने व 4000 रुपये रोख रक्कम असा एकूण 2 लाख 55 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. हा मुद्देमाल शनिवारी संबंधिताना पोलिस निरीक्षक प्रदीप कसे यांच्या हस्ते परत देण्यात आला.