कल्याण । एकीकडे मिस वर्ल्ड सौंदर्यस्पर्धेवर भारताच्या मनुषी छिल्लरने विजेतेपदाचा मुकुट मिळवला असतानाच कल्याणमधील टिना जैन-चौधरीने दिल्ली-गुडगाव इथे झालेल्या मिसेस इंडिया होममेकर 2018 या सौंदर्यस्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे. तीच्या या यशामुळे कल्याणच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. आयझा नाझ-जोशीतर्फे आयोजित या सौंदर्यस्पर्धेत टिनाने ‘एमएस’विभागात महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करताना या विजेतेपदाला गवसणी घातली आहे तसेच आपल्या संभाषण कौशल्याच्या बळावर तिने या स्पर्धेतील ‘बेस्ट इंटरव्ह्यूअर’चा बहुमानही मिळवला आहे. मिसेस, क्लासिक आणि एमएस अशा तीन गटांत ही स्पर्धा घेण्यात आली होती. त्यात टिना जैन-चौधरीसह देशातील 40 सौंदर्यवतींनी या सहभाग घेतला होता. या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेतील विजयामुळे पुढील वर्षी जून महिन्यात होणार्या आंतराष्ट्रीय स्पर्धेमध्ये टिना भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे, तर यावर्षी झालेल्या ‘मिसेस महाराष्ट्र’ स्पर्धेतील विजेतेपदावरही टिनाने आपले नाव कोरले.
इव्हेंट मॅनेजमेंट सांभाळत उतरली फॅशन जगतात
टिनाने कल्याणातील मराठी माध्यमाच्या सुभेदार वाडा शाळेतून आपले दहावीचे शिक्षण घेतले आहे. इंजिनिअरिंगमधील बी.ई.कंप्यूटर पदवीही प्राप्त केली आहे, तर गेल्या काही वर्षांपासून इव्हेंट मॅनेजमेंटचा व्यवसाय यशस्वीपणे सांभाळणारी टिना आता फॅशन जगतात आपले नशीब आजमावत आहे. टिनाच्या या यशामुळेे सर्वच स्तरातून तिच्यावर अभिनंदन आणि कौतुकाचा वर्षाव होत आहे. एखाद्या महिलेने जर मनाशी ठाम निश्चय केला, तर ती कोणतेही अशक्य ध्येय साध्य करू शकते, असे सांगतानाच तिने आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी आपण पूर्णपणे तयार असल्याचे प्रसिद्धीमाध्यमांशी बोलताना सांगितले.