पुणे : (विशेष प्रतिनिधी) लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे खापर पणतू व काँग्रेसचे युवानेते रोहित टिळक यांची नार्को चाचणी करण्याची मागणी पीडित 41 वर्षीय महिलेने न्यायालयात केली आहे. या पीडितेवर बलात्कार, अनैसर्गिक संभोग व मारहाण केल्याचे गुन्हे टिळकांविरोधात दाखल झाले आहेत. दरम्यान, या पीडित महिलेकडून टिळकांच्या अटकपूर्व जामिनाला तीव्र विरोध करण्यात आला. पत्रकारांशी बोलताना पीडितेने सांगितले, की रोहित टिळक यांनी आपणास केलेल्या तब्बल दोन हजार कॉल्सचे डिटेल्स व मॅसेजचे डिटेल्स आपणाकडे पुराव्यादाखल आहेत. तसेच, अन्यही पुरावे न्यायालयापुढे सादर करण्यात आलेले आहेत. अॅड. तौसिफ शेख या पीडित महिलेची न्यायालयापुढे बाजू मांडत असून, सर्व पुरावे न्यायालयास दिल्याचेही त्यांनी सांगितले. पीडित महिला स्वतः उच्च न्यायालयात वकील आहे.
टिळकांच्या अटकपूर्व जामिनास तीव्र विरोध
लग्नाचे आमिष दाखवून 38 वर्षीय रोहित टिळक यांनी वारंवार बलात्कार केला, अनैसर्गिक संभोग केला आणि मारहाण केली, असे आरोप 41 वर्षीय पीडित महिलेने केले असून, तिच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. टिळक यांच्याकडून अॅसिड हल्ल्याची धमकी देण्यात आल्याचा आरोप केल्यानंतर या पीडितेला न्यायालयीन आदेशावरून पोलिस संरक्षण देण्यात आलेले आहे. दरम्यान, या पीडितेच्यावतीने रोहित टिळक यांच्या नार्को टेस्टची मागणीही करण्यात आली आहे. टिळक खोटे बोलत असल्याने त्यांची व आपलीही नार्को टेस्ट करण्यात यावी, अशी मागणी पीडितेने न्यायालयात केली. तसेच, अटकपूर्व जामिनासही तिने विरोध केला. पीडितेच्या अर्जावर सोमवारी सुनावणी झाली. परंतु, फिर्यादीचा अर्ज मिळाला नाही, अशी सबब टिळक यांच्या वकिलांनी सांगितल्याने अटकपूर्व जामीन मंगळवारपर्यंत वाढवून मंगळवारी पुन्हा या प्रकरणावर सुनावणी घेण्यात आली. यावेळीही पीडितेने टिळकांच्या अटकपूर्व जामिनास कडाडून विरोध केला. या प्रकरणाच्या तपास अधिकारी पोलिस निरीक्षक संगिता पाटील यांनीही आरोपींना पोलिस कोठडी देण्याची मागणी केली होती.
टिळकांच्या अडचणी चांगल्याच वाढल्या!
रोहित टिळक यांच्यावतीने अॅड. नंदू फडके यांनी जोरदार बाजू मांडली. खोटे आरोप करून टिळक यांना बदनाम करण्याचा हा प्रयत्न असल्याचे फडके म्हणाले. पीडितेच्यावतीने तब्बल 201 छोटे-मोठे पुरावे न्यायालयापुढे सादर करण्यात आले असून, त्यामुळे टिळक यांच्या अडचणी चांगल्याच वाढलेल्या आहेत. तसेच, पीडितेला अॅसिड हल्ल्याची धमकी मिळाल्याने याप्रकरणाचे गांभीर्य चांगलेच वाढलेले आहे. शिवाय, पीडितेची ससून रुग्णालयात करण्यात आलेली वैद्यकीय चाचणी आणि इतर 13 रिपोर्टही पीडितेची बाजू बळकट करणारे आहेत. रोहित टिळक यांच्या नावाने ही पीडिता मंगळसूत्रही घालत होती, अशी बाब पोलिस तपासात पुढे आली आहे.
काँग्रेसची राजकीय डोकेदुखी वाढली
राहित टिळक यांच्या बलात्कार व लैंगिक शोषण प्रकरणाने काँग्रेसची चांगलीच डोकेदुखी वाढलेली आहे. रोहित हे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे खापर पणतू आहेत. महाराष्ट्रात गणेशोत्सव सुरु करण्यात टिळकांचा सिंहाचा वाटा होता. नेमके गणेशोत्सव कालावधीतच हे प्रकरण बाहेर आलेले आहे. रोहित यांना कोणत्याहीक्षणी अटक होण्याची शक्यता असून, तसे झाले तर काँग्रेसच्या अडचणी वाढणार आहेत. टिळक यांनी काँग्रेसने पालकमंत्री गिरीश बापट यांच्याविरोधात विधानसभेची निवडणूक लढविली होती. त्यात त्यांचा पराभव झाला होता.