टिळकांचे विचार आचरणात आणून दांडेकर दाम्पत्याने कृतीत उतरवले

0

पुणे । कौशल्यपूर्ण, प्रकल्पाधारित शिक्षणातून चिखलगावमध्ये डॉ. राजाभाऊ आणि रेणू दांडेकर यांनी विद्यार्थी घडविले आहेत. कठीण प्रसंगालाही सामोरे जाणारे विद्यार्थी घडविण्याचे काम हे दाम्पत्य करीत आहे. शिक्षणासंबंधी लोकमान्य टिळकांनी मांडलेले विचार आचरणात आणून ते कृतीत उतरविण्याचे कार्य दांडेकर दाम्पत्याने केले आहे. टिळकांच्या जयंतीदिनी त्यांचा सन्मान करताना मला अभिमान वाटतो, अशा शब्दात पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांनी दांडेकर दाम्पत्याचे कौतुक केले.

आंतरराष्ट्रीय पालक दिनाचे औचित्य साधून डीपर, सर फाऊंडेशन व तुम्ही-आम्ही पालक मासिकाच्या वर्धापदिनानिमित्त डीपर व सर फाऊंडेशनतर्फे देण्यात येणारा ’महापालक सन्मान 2017’ चिखलगाव येथील सामाजिक कार्यकर्ते डॉ. राजाभाऊ व रेणूताई दांडेकर यांना प्रदान करण्यात आला. केसरीवाड्यातील लोकमान्य सभागृहात रविवारी झालेल्या या कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार डॉ. उदय निरगुडकर, सर फाउंडेशनचे संस्थापक हरीश बुटले, रोहिणी बुटले उपस्थित होते. याप्रसंगी दोन्ही हात नसलेल्या लक्ष्मी शिंदे या विद्यार्थिनीला व्यासपीठावर बोलावून सन्मानित करण्यात आले. तसेच बुटले कुटुंबियांच्या वतीने तिचा शैक्षणिक खर्च उचलत 50 हजारांचा धनादेश तिच्याकडे सुपूर्त करण्यात आला.

शिक्षकांना प्रोत्साहन द्या
तरुणाईकडे मोठी क्षमता आहे. त्यांना दिशा देण्याचे काम शिक्षक व पालक करतात. त्यामुळे शिक्षकांचाच उचित सन्मान करून विद्यार्थ्यांना घडविण्यासाठी त्यांना प्रोत्साहित केले पाहिजे. देशभक्ती वाढवणारी पिढी तयार व्हायला हवी. त्याच भावनेतून गीतारहस्यात टिळकांनी सांगितलेला कर्मयोग दांडेकर आचरणात आणत आहेत. आपण सर्वानी अशा सामाजिक कामाचे कौतुक करून प्रोत्साहन दिले पाहिजे. तसेच त्यामध्ये सहभागी झाले पाहिजे, असे महापौर मुक्ता टिळक यांनी यावेळी सांगितले.

जीवन सार्थकी लावण्यावर भर द्या
हा सन्मान माझ्या गावातील प्रत्येक व्यक्तीचा व संस्थेतील प्रत्येक विद्यार्थ्यांचा आहे. जीवनात यशस्वी होण्यापेक्षा जीवन सार्थकी लावण्यावर आपला भर हवा. त्यामुळे आजच्या या सन्मानाने शेवटच्या श्वासापर्यंत काम करत राहण्याची जबाबदारी आली आहे. समाजातील अनेक किमयागार माणसांकडून प्रेरणा घेत हे काम उभारले आहे. त्यातून आमचे पालकत्व परिपक्व होत गेले. त्याच पालकत्वाची जाण ठेवून आपण वागले पाहिजे, असे डॉ. राजाभाऊ दांडेकर यांनी यावेळी सांगितले.

युवकांची आज देशाला गरज
सामाजिक जाणिवेतून एक वेगळी शैक्षणिक रचना उभी करण्याचा प्रयत्न चिखलगावात केला आहे. कल्पक, निर्मितीक्षम विचारांच्या युवकांची आज देशाला गरज असून, त्या दृष्टीने तेथे काम चालत आहे. मायेची उब देऊन त्यांना त्यांचे आयुष्य घडविण्यासाठी प्रोत्साहीत करण्याचे काम आम्ही करतो आहोत, असे रेणू दांडेकर यांनी पुरस्काराला उत्तर देताना सांगितले. हरीश बुटले यांनी प्रास्ताविक केले. मुक्ता घरसोळे यांनी सूत्रसंचालन तर रोहिणी बुटले यांनी आभार मानले.