टिळक महापौर, कांबळे उपमहापौर!

0

पुणे : शहराच्या इतिहासात पहिल्यांदाच महापालिकेवर बहुमताचा झेंडा रोवणार्‍या भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविका मुक्ता टिळक यांची शहराच्या 56व्या महापौर म्हणून बहुमताने निवड झाली. त्या लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पणती सून आहेत. त्यांच्यासोबत भाजपचे नवनाथ कांबळे यांची उपमहापौर म्हणून वर्णी लागली आहे.

शिवसेना तटस्थ; मनसेचा बहिष्कार
महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपच्या मुक्ता टिळक यांना 98 तर त्यांच्या विरोधी उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या नंदा लोणकर यांना 52 मते मिळाली. दुसरीकडे उपमहापौर कांबळे यांनाही 98 तर विरोधी उमेदवार काँग्रेसच्या लता राजगुरू यांना 52 मते मिळाली. शिवसेनेने महापौर आणि उपमहापौराच्या लढतीत माघार घेतली तरी प्रत्यक्ष मतदान करताना तटस्थ राहण्याचा पर्याय स्वीकारला. तर अवघे 2 सदस्य असलेल्या मनसेच्या सभासदांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकला. पुणे महापालिका निवडणुक आरपीआयच्या उमेदवारांनी कमळ चिन्हावर लढविली असल्याने उपमहापौरपद भाजपाकडेच आहे, असेच म्हणावे लागेल.

स्थायी समितीसह इतर सर्व पदे भाजपलाच
23 फेब्रुवारी रोजी जाहीर झालेल्या महापालिकेच्या निकालानंतर महापौर आणि उपमहापौर यांच्यांसह स्थायी समिती अध्यक्ष पदासह आणि इतर सर्व पदे भाजपला मिळणार हे स्पष्ट झाले होते. महापौर पदासाठी सर्वसाधारण महिला आरक्षण पडल्यानंतर भाजपने अनुभवी असलेल्या टिळक यांना संधी दिली होती. भाजपकडे स्पष्ट बहुमत असल्याने ही निवडणूक केवळ औपचारिकता होती. त्याप्रमाणेच विरोधकांना कोणतीही संधी न देता भाजपने सहजपणे विजयावर नाव कोरले.

ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक
त्यापूर्वी भाजपच्यावतीने उमेदवार आणि कार्यकर्त्यांसह शनिवारवाड्यापासून महापालिका मुख्यभवनापर्यंत ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. यावेळी भाजप नगरसेवकांनी भगवे तर आरपीआय नगरसेवकांनी निळे फेटे परिधान केले होते. भाजपच्या सर्व महिला नगरसेविकांनी केशरी साडी तर नगरसेवकांनी पांढरे कुर्ते परिधान केले होते. महापौर लढतीचा निकाल लागताच पालकमंत्री गिरीश बापट, शहराध्यक्ष योगेश गोगावले, खासदार अनिल शिरोळे, संजय काकडे, आमदार मेधा कुलकर्णी, जगदीश मुळीक, भीमराव तापकीर, माधुरी मिसाळ यांनी सभागृहात प्रवेश करत नवनिर्वाचित महापौरांचे अभिनंदन केले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विजयाच्या घोषणा देण्यात आल्या.