टीईटी परिक्षार्थींचा मोबाईल बॅगेतून लांबविला

0

जळगाव । मेहरूण येथील मिल्लत हायस्कुल येथे टीईटी परिक्षा देण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्याच्या बॅगेतून अज्ञात चोरट्याने चार हजार रुपये किंमतीचा मोबाईल चोरून नेल्याचा प्रकार आज उघडकीस आला असून याप्रकरणी विद्यार्थ्याने एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दिला आहे.

चाळीसगावातील अभियंतानगरातील कमलेश दिलीप अहिरे (वय-20) हा विद्यार्थी राष्ट्रीय ज्युनिअर महाविद्यालयात बीएचे शिक्षण घेत आहे. 22 जुलै रोजी जळगावातील मेहरूण परिसरातील मिल्लत हायस्कुल येथे टीईटीची परिक्षा असल्यामुळे कमलेश हा सकाळी 10 वाजता जळगावात आला होता. मात्र, परिक्षा हॉल केंद्रात मोबाईल बाळगण्यास परवानगी नसल्याने कमलेश याने त्याचा मोबाईल हा बॅगेत ठेवून बॅग परिक्षा हॉलच्याबाहेर समोरच ठेवली आणि पेपर देण्यासाठी हॉलमध्ये निघून गेला. दुपारी 1 वाजेच्या सुमारास पेपर संपल्यानंतर कमलेश परिक्षा हॉलबाहेर आल्यानंतर त्याने बॅग तपासली असता त्यात त्याचा मोबाईल मिळून आला नाही. आजु-बाजूला शोध घेवूनही मोबाईल न मिळाल्याने अखेर चोरीला गेल्याची कमलेशला खात्री झाली. याप्रकरणी कमलेश अहिरे याने आज एमआयडीसी पोलिस ठाण्यात मोबाईल हरविल्याबाबतचा तक्रारी अर्ज दिला आहे.