टीएमटी कर्मचाऱ्यांना मिळणार वेतनासह दरमहा महागाई भत्ता

0

ठाणे : ठाणे महापालिकेच्या परिवहन उपक्रमाच्या (टीएमटी) कर्मचाऱ्यांच्या वेगवेगळ्या देय रक्कमापैकी सहाव्या वेतन आयोगातील महागाई भत्यापोटी द्यावयाच्या रक्कमेचा टीएमटीच्या अर्थसंकल्पात उल्लेख करण्यात आला होता. त्यातील वाढीव महागाई भत्त्यासाठी महानगरपालिका प्रशासनाने वाढीव अनुदान मंजूर केल्याने मार्च २०१७ पासून दरमहा वेतनासोबत महागाई भत्याची वाढीव रक्कमही कर्मचाऱ्यांना अदा करण्यास सुरुवात झाली आहे. या निर्णयामुळे टीएमटी कर्मचाऱ्यांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

टीएमटीने यंदा २०१७-१८ या वर्षासाठी २६८ कोटी २२ लाखांचा अर्थसंकल्प मांडला असून यात ठाणे महापालिकेकडून १३६ कोटी १३ लाखांचे अनुदान अपेक्षित धरले आहे. त्यानुसार मार्च २०१७ अखेरपर्यंत कर्मचाऱ्यांची थकीत रक्कम ३७ कोटी ४९ लाख एवढी आहे. यामध्ये पाचव्या वेतन आयोगानुसार महागाई भत्त्याच्या फरकापोटी देय असलेल्या ९ कोटी २५ लाख पैकी ९ कोटी ४ लाखांची रक्कम अदा केली होती. तर सहाव्या वेतन आयोगापोटी तब्बल २४ कोटी २९ लाख ४ हजार ६२८ रुपयांची थकबाकी आहे. त्यापैकी वाढीव महागाई भत्याची रक्कम कर्मचाऱ्यांना मार्च महिन्यापासूनच्या वेतनामध्ये देण्यास सुरुवात झाली आहे. टीएमटीमध्ये सुमारे २ हजार ३०० कर्मचारी कार्यरत असून महागाई भत्ता मिळणार असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

यासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, टीएमटी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता (डीए) मंजूर झाला असला तरी कर्मचाऱ्यांची अद्याप बरीच देणी बाकी आहे. सार्वजनिक सुट्यांपोटी ४ लाख ३० हजार, वैद्यकीय भत्त्यापोटी २ कोटी ६३ लाख ६० हजार, रजा प्रवासभत्ता ५ कोटी ८१ हजार, प्रोत्साहन भत्ता ३५ लाख ५८ हजार ३०० आणि शैक्षणिक भत्त्यापोटी ९ लाख अशी एकूण सुमारे ३७ कोटी ४८ लाख ९० हजार २८ रुपयांची थकबाकी असून सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची २००४ ते जून २०१४ पर्यंत १५ कोटी ५९ लाखांची देणी शिल्लक असल्याची माहित उपलब्ध झाली आहे.

महापालिकेकडून वाढीव अनुदान मंजूर
महापालिका प्रशासनाने परिवहन उपक्रमासाठी ४५ लाखांचे वाढीव अनुदान मंजूर केले आहे. त्यात टीएमटी व्यवस्थापनाकडून मागणी करण्यात आलेले २ कोटी ३० लाख रुपये मिळून एकूण २ कोटी ७५ लाखांचे अनुदान टीएमटीला दरमहा मिळणार आहे. त्यामुळे टीएमटी कर्मचाऱ्यांना मासिक वेतनातच महागाई भत्ता अदा करण्यात येत आहे.
– सुधीर राऊत, टीएमटी व्यवस्थापक