सुप्रिम कॉलनीतील रहिवासी मालवाहू चालक ; स्वतःच्या मालकीच्या नवीन चारचाकीचे स्वप्न अपूर्ण
जळगाव- मालवाहू चालक मित्र तसेच घरी आलेल्या मेव्हण्यांच्या भावासोबत मेहरुण तलावावर पोहण्यासाठी गेलेल्या पाडुंरग मारोती आठरे वय 22 या रा. सुप्रिम कॉलनी याचा तलावाकाठी टीक टीकचा व्हिडीओ करत असतांना तोल तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी 1 वाजेच्या सुमारास घडली. जिल्हा रुग्णालय, यानंतर गणपती हॉस्पिटल व भंगाळे हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ फिरविल्यानंतर मृतदेह कुटुंबिय शवविच्छदेन न करताच थेट घरी घेवून गेले होते. एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या कर्मचार्यांनी हा प्रकार बेकायदेशीर असल्याचे सांगितल्यानंतर त्यांच्या सुचनेनुसार दुपारी घरी आणलेला मृतदेह रात्री 8.30 वाजेच्या सुमारास जिल्हा रुग्णालयात नेण्यात आला होता.
सुप्रिम कॉलनीत पाडुरंग याची बहिण अर्चना ही रक्षाबंधनसाठी माहेरी आलेली आहे. रविवारी दुपारी पांडुरंग हा सुप्रिम कॉलनी परिसरातील त्याचे वाहनचालक तीन ते चार मित्र तसेच मेव्हण्यांचा भावासोबत मेहरुण तलावावर पोहण्यासाठी गेला. या ठिकाणी त्याचे मेव्हण्याचा महादू यास पोहणे असल्याने ते पोहतांना ते लांबपर्यंत निघून गेले. काठावर असलेला पाडुरंग हा त्याच्या मित्रासोबत पाण्यात उतरुन त्याच्या मोबाईलमध्ये टीकटॉकचा व्हिडीओ करत होता. व्हिडीओ बनवित असतांना अचानकपणे तोल जावून तो खोल पाण्यात बुडाला, असे पाडुरंगचे काका बापू नाना आवटे यांनी बोलतांना सांगितले.
वाचविण्याची धडपड अन् रुग्णालयांमध्ये फिरवाफिरव
मेव्हण्याचा भाऊ पोहून पुन्हा काठाकडे परतण्याचा घात आणि पाडुरंग बुडण्याचा घात एकच झाला. त्यांनी मेव्हण्याचा भावासोबत इतर मित्रांनी पाडुरंगला बाहेर काढले व वाहनातून तत्काळ जिल्हा रुग्णालयात हलविले. येथून पुन्हा गणपती हॉस्पिटल तेथून ऑर्किड हॉस्पिटलमध्ये हलविले. यानंतर पुन्हा भंगाळे हॉस्पिटलमध्ये नेले. याठिकाणी दवाखान्याच्या बाहेरच डॉक्टरांनी तपासणी केली व पाडुरंगचा मृत्यू झाला असून त्याला घरी घेवून जाण्यास सांगितले. याठिकाणी कुटुंबियांनी आक्रोश केला.
नवीन चारचाकीचे स्वप्न अपूर्ण
पांडुरंग याच्या पश्चात्त वडील मारोती, आई कावेरी, मोठा भाऊ किरण, बहिण अर्चना, वहिनी असा परिवार आहे. वडील हातमजुरी करत होते तर मोठा भाऊ किरण याची एमआयडीसी कंपनी परिरात चहाची टपरी आहे. मालवाहू गाडी चालवून तो पाडुंरंग त्यांना उदरनिर्वाहासाठी हातभार लावत होता. मोठा भाऊ किरण व बहिण विवाहित आहे. पांडुरंग हा अविवाहित असून त्याने चारचाकी शोरुमध्ये चारचाकी बुकींग केली आहे. रक्षाबंधनच्या दिवशी खरेदी करणार होता, मात्र त्यादिवशी चारचाकी मिळाली नाही. गणेश चतुर्थीच्या गाडी मिळणार होती. त्यापूर्वी पाडुरंगवर काळाने झडप घातली व त्याचा मृत्यू झाला. नवीन चारचाकीचे स्वप्न अपूर्ण राहिल्याचे सांगत कुटुंबिय आक्रोश करत होते.
अन् मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात
भंगाळे हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी मयत झाल्याचे सांगितल्यावर पाडुरंगचे कुटुंबिय मृतदेह थेट घरी घेवून गेले होते. तलावात कुणीतरी बुडाल्याची माहिती पोलिसांना मिळाली मात्र तो कुठला रहिवासी हे कळत नव्हते. एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरिक्षक विशाल सोनवणे, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, आनंदसिंग पाटील, सतीश गरजे यांना मयत तरुण सुप्रिम कॉलनीतील रहिवासी असल्याचे कळाल्यानंतर त्यांनी शोधाशोध सुरु केली अखेर रात्री 8 वाजेच्या सुमारास पोलिसांना पाडुरंगचे घर सापडले. विशाल सोनवणे यांनी कुटुंबियांना पाडुरंगचे शवविच्छेदन करावे लागेल, असे सांगितले. मात्र कुटुंबियांनी नकार दर्शवित आता सर्व तयारी झाली असून सर्व नातेवाईकही जमले आहे असे सांगितले. यावरुन काही काळ गोंधळ उडाला अखेर समाजातील इतरांनी कुटुंबियांची समजूत घातली. यानंतर 8.30 वाजेच्या सुमारास मृतदेह जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आला.