नवी दिल्ली : टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी यांचे वडिल तौसीफ अहमद यांचे शुक्रवारी रात्री निधन झाले. तौसिफ यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यानंतर कुटुंबियांनी त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वींच त्यांचा मृत्यू झाला. शमी उत्तर प्रदेशातील अमरोहा जिल्ह्यातील सहसपुर अलीनगरमधील मुळ गावी पोहचणार आहे. शमीचे वडिल काही महिन्यांपासून आजारी होते. काही दिवसांपूर्वीच त्यांच्यावर गुरुग्राम येथे ऑपरेशन करण्यात आले होते.
देशही मला पित्याप्रमाणेच: शमी
गेल्या काही दिवसांपासून शमीच्या वडिलांवर उपचार सुरू होते. अखेर शुक्रवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. या सगळ्या काळात त्यांचा मुलगा मोहम्मद शमी त्यांच्यासोबत नव्हता. मोहम्मद शमी गेल्या काही दिवसांपासून बेंगळुरूमधील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये प्रशिक्षण आणि सराव करतो आहे. त्यामुळे त्याला वडिलांच्या सोबत राहण्यास वेळ मिळाला नाही. त्याचा भाऊ आसिफने सांगितले की, घरच्या लोकांनी मोहम्मदला बेंगळुरूमध्ये जाण्यापासून थांबवले होते. वडील आजारी आहेत. त्यामुळे तू त्यांच्यासोबतच राहा, असा सल्ला घरातील ज्येष्ठ लोकांनी दिला होता. पण देशही माझ्या पित्याप्रमाणेच आहे, असे सांगत त्याने प्रशिक्षण कार्यक्रमाला जाण्याला पसंती दिली होती. आसिफने म्हटले आहे की, वडिलांना अशा अवस्थेत सोडून जाताना मोहम्मद खूप भावूक झाला होता. पण ऑस्ट्रेलिया मालिकेपूर्वी तो तंदुरुस्त होणे भारतीय टीमसाठी अत्यंत आवश्यक असल्यामुळे त्याने मनावर दगड ठेवून प्रशिक्षणासाठी बेंगळुरूला जाण्याचा निर्णय घेतला. आता मला विश्वास आहे की तो पुढच्या मालिकेमध्ये आतापर्यंतच्या सर्वोत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करेल. वडिलांच्या निधनानंतरही मोहम्मद शमी माध्यमांच्या समोर आला नाही. त्याचबरोबर त्यांनी कोणतीही प्रतिक्रियाही व्यक्त केलेली नाही. मोहम्मद शमीचे वडील तौसिफ अली यांना क्रिकेटबद्दल नितांत आदर होता.