टीम इंडियाच्या खेळाडूला कोरोना, दुसरी टी-20 पुढे ढकलली

कोलंबो : श्रीलंका दौऱ्यावर असलेल्या टीम इंडियाला मोठा धक्का लागला आहे. भारताचा ऑलराऊंडर कृणाल पांड्या याची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे, त्यामुळे आज होणारी दुसरी टी-20 पुढे ढकलण्यात आली आहे. टीममधल्या इतर खेळाडूंची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली तर हा सामना बुधवारी होईल, एएनआयने याबाबतचं वृत्त दिलं आहे.

‘कृणाल पांड्याची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे, त्यामुळे दुसरी टी-20 पुढे ढकलण्यात आली आहे. आता इतर खेळाडूंच्या कोरोना टेस्ट निगेटिव्ह आल्या तर बुधवारी दुसरी टी-20 खेळवली जाईल. खेळाडू सध्या आयसोलेट झाले आहेत,’ अशी प्रतिक्रिया सूत्रांनी दिली आहे.

कृणाल पांड्याची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे आता पृथ्वी शॉ आणि सूर्यकुमार यादव यांच्या इंग्लंड दौऱ्यावर जाण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. सोमवारीच बीसीसीआयने सूर्यकुमार आणि पृथ्वी श्रीलंका दौऱ्यानंतर इंग्लंडला रवाना होतील, असं सांगितलं होतं. शुभमन गिल, आवेश खान आणि वॉशिंग्टन सुंदर यांना दुखापत झाल्यामुळे हे दोघांची इंग्लंड दौऱ्यासाठी निवड करण्यात आली आहे.