टीम इंडियाला सर्व स्वरुपांसाठी एकच कर्णधार हवा

0

पुणे: क्रिकेटमधील सर्व स्वरुपांसाठी एकाच कर्णधाराची नियुक्ती असणे योग्य आहे. कर्णधारपदाचे विभाजन करणे परदेशी संघांकरिता योग्य ठरत असेल. मात्र भारतीय खेळाडूंची मानसिकता लक्षात घेतली तर कसोटीसाठी एक व अन्य स्वरूपांच्या सामन्यांसाठी दुसरा कर्णधार असणे अयोग्य आहे, असे भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने सांगितले.

खेळाडू म्हणून माझ्यावरील जबाबदारी कायम
कर्णधारपदाची धुरा दुसऱ्याकडे सोपवल्यावर कसे वाटत आहे, असे विचारले असता धोनी म्हणाला, ‘‘आता खऱ्या अर्थाने माझ्यावरील ओझे कमी झाले आहे. अर्थात संघातील एक खेळाडू म्हणून माझ्यावरील जबाबदारी कायमच राहणार आहे. ऑस्ट्रेलिया किंवा इंग्लंड आदी देशांमध्ये वेगवेगळय़ा स्वरूपाच्या क्रिकेटसाठी वेगवेगळे कर्णधार चालू शकतात. मात्र भारतीय संघाबाबत असे करणे फारसे रुचणारे नाही. विराट कोहलीकडे कसोटीसाठी कर्णधारपद दिल्यानंतर त्याने सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. कर्णधार म्हणून तो स्थिरावल्यानंतर त्याच्याकडे सर्वच संघांचे नेतृत्व सोपवणे योग्य जावे, यासाठीच मी कर्णधारपदाचा त्याग केला असे धोनी म्हणाला.